अकोला : जिल्ह्यात केंद्रीय कपास निगमच्या सुरू असलेल्या कापूस खरेदी केंद्रांपैकी पाच केंदे्र विविध कारणांनी बंद झाली आहेत. त्यामध्ये जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी बंद असल्याने त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी दुसºया तालुक्याच्या नेण्याची वेळ आली आहे. बंद असलेली केंद्रे तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व कापूस खरेदी केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली; मात्र जिनिंग-प्रेसिंग युनिट सुरू झालेले नव्हते. कापूस खरेदी कामी काही जिनिंग-प्रेसिंग युनिटधारक कापूस पणन महासंघ व सीसीआय यांना सहकार्य करीत नसल्याचे प्रकार घडले. तसेच किरकोळ कारणाने काम बंद ठेवण्यात आले. त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी सातत्याने झाल्याने यापुढे असा प्रकार घडल्यास युनिटधारकांविरुद्ध कारवाई करण्यासोबतच लायसन रद्द केले जाईल, असा इशारा जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी आधीच दिला. सोबतच पालकमंत्री कडू यांनीही २१ मे रोजीच्या बैठकीत निर्देश दिले. त्यानुसार कोणत्याही शेतकºयाचा कापूस घरात राहणार नाही, असे बजावले होते. तेच प्रकार आता पुन्हा घडत आहेत. जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी बंद असल्याने संबंधित तालुक्यातील केंद्रावर कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पातूर, पारस, चिखलगाव, तेल्हारा, अकोला येथील जिनिंग- प्रेसिंग फॅक्टरी बंद आहेत. त्यामुळे अकोला तालुक्यासह पारस केंद्रातील कापूस बार्शीटाकळी येथे, तेल्हारा केंद्रातील कापूस हिवरखेड, अकोट येथे, तर पातूर केंद्रात येणारा कापूस कापशी येथे खरेदी केला जात आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सीसीआयच्या वतीने चिखलगाव येथील सम्यक कृषी उत्पादक प्रक्रिया सहकारी संस्था, निंबी मालोकार येथील श्रद्धा जिनिंग-प्रेसिंग, कापशी येथील केडिया कॉट अॅण्ड फायबिस, अकोट येथे सीसीआय फॅक्टरी, पारस येथील माउली जिनिंग, पातूर येथील साईबाबा, बार्शीटाकळी येथील शिवम, इकरा, जे.डी. तिरुपती, विदर्भ जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी येथे खरेदी सुरू करण्यात आली. त्याप्रमाणे सर्वच केंद्रात ती सुरू करावी, अशी मागणी होत आहे. सोबतच अकोला तालुक्यातील आपातापा येथील जय गुरू जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीमध्येही सीसीआयने अद्यापही खरेदी सुरू केली नाही, ती तातडीने करावी, अशी मागणीही शेतकºयांनी केली आहे.
पाच कापूस खरेदी केंद्रे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:37 AM