अकोला, दि. २५- पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांचा विशेष निधी देऊन सिंचन प्रकल्पाचा लाभ शेतकर्यांना मिळवून द्यावा, अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे केली. आ. सावरकर यांचा प्रस्ताव महाजन यांनी तातडीने पुढील कारवाईसाठी पाठविला आहे.काटेपूर्णा, मोर्णासह जिल्हय़ातील इतर प्रकल्पांत दुरुस्तीचे काम युद्ध स्तरावर करून कोरडवाहू खरीप पिकांना आधार देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी, असेही अकोला पूर्वचे आ. सावरकर यांनी म्हटले आहे. जलसंपदा मंत्री महाजन यांनी विविध समस्यांवर जलसंपदा विभागाचे सचिव व्ही.एम. कुलकर्णी यांना निर्देश देऊन तातडीने बैठक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. कालव्यांची त्वरित दुरुस्ती करून खरीप हंगामात पेरणी झालेल्या तूर व कपाशी या हंगामी पिकांना संरक्षित सिंचन करणे तसेच येत्या रब्बी हंगामासाठी पाणी पुरवठा करणे याकरिता ऑक्टोबर महिन्याच्या प्रथम आठवड्यात कालव्यांद्वारे पाणी सोडण्यात यावे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ठाकरे, उपविभागीय अभियंता पाटील व बोके हे अधिकारी उपस्थित होते. दुरुस्ती करताना लाभार्थी शेतकरी व पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष यांच्यासोबत समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. प्रकल्पांचा लाभ परिसरातील शेतकरी यांना व्हावा, यासाठी पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी खात्याचे अधिकारी यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आमदार सावरकर यांनी क्षेत्रीय बैठका आयोजित केल्या आहेत.
पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीसाठी पाच कोटी द्या!
By admin | Published: September 26, 2016 3:14 AM