थकीत टॅक्स; वसंत टाॅकीज सील
अकाेला : मालमत्ताधारक राधाकिशन तोष्णीवाल यांच्याकडे सन २०१९ ते सन २०२१ पर्यंत ३ लाख रुपये मालमत्ता कर थकीत असल्याने साेमवारी वसंत टाॅकीजला सील लावण्यात आले. यांसह सुशील कुमार खोवाल यांच्याकडे सन २०१७ ते सन २०२१ पर्यंत ३ लाख ८५ हजार व नरेश अग्रवाल यांच्याकडे २०१७ ते सन २०२१ पर्यंत १० लाख रुपये टॅक्स थकीत असल्याने त्यांच्या मालमत्तेला सील लावण्यात आले.
‘प्रभागातील समस्या निकाली काढा!’
अकाेला : महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या प्रभाग क्रमांक १ मधील रहिवाशांना मूलभूत साेयी-सुविधांअभावी नरकयातना भाेगाव्या लागत आहेत. प्रभागात रस्ते, नाल्या, पथदिव्यांची सुविधा नाही. पाणीपुरवठ्याची याेजना अर्धवट आहे. नागरिक वैतागले असून प्रभागातील समस्या निकाली काढण्याची मागणी काॅंग्रेसचे महासचिव ईस्माईल हबीब टीव्हीवाले यांच्यासह असंख्य नागरिकांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांच्याकडे केली.
किराणा बाजारात उप डाकघर सेवारत
अकाेला : शहरातील मिनी बायपास परिसरातील नवीन किराणा बाजारात हाेलसेल किराणा मार्केट उप डाकघर कार्यान्वित करण्यात आले. यावेळी डाकघरचे प्रवर अधीक्षक बी. कृष्णा, किराणा बाजारचे सचिव कासमअली नानजीभाई, काेषाध्यक्ष चंचल भाटी, कार्यकारिणी सदस्य ज्ञानप्रकाश खंडेलवाल, महेंद्रकुमार कांतिलाल, तुषार भिमजीयानी उपस्थित हाेते.
पुरामुळे पाेषण आहार, पुस्तकांचे नुकसान
अकाेला : शहरात २१ जुलैच्या मध्यरात्री आलेल्या पुराचे पाणी घरांत, बाजारात व शाळांमध्ये शिरल्याने वित्तहानी झाली. शहरालगतच्या भाैरद येथील माध्यमिक विद्यालयात पुराच्या पाण्यामुळे खाेल्यांमधील शालेय पाेषण आहार, पुस्तके, फ्रीज, संगणक आदी विविध साहित्याचे माेठे नुकसान झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.
‘भगतवाडीमध्ये खडीकरण करा’
अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या भगतवाडी, भगिरथवाडी आदी भागात नागरिकांना धड चालण्यासाठी रस्ते उपलब्ध नाहीत. पावसामुळे सर्वत्र चिखल साचला असून साचलेल्या पाण्यातून वाट काढताना महिला, वयाेवृध्द नागरिक व लहान मुलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यांचे खडीकरण करण्याची मागणी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे.