मूर्तिजापूर : तालुक्यातील लोकसंख्येने लहान असलेल्या पोही येथे डेंग्यूसदृश आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. गत पंधरा दिवसांत आतापर्यंत ५ जणांना लागण झाली आहे. सद्य:स्थितीत तीन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे.
गावात आरोग्य पथक दाखल झाले असून, नागरिकांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती साथरोग विभागाच्या प्रमुखांनी दिली. तपासणी, सर्वेक्षणासह आजारी नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येत आहेत. तपासणीअंति हवाल प्राप्त होईल. यापूर्वीही पाच रुग्णांना डेंग्यूने ग्रासले हाेते.
आराेग्य विभागाच्या माहितीनुसार माना येथे डेंग्यूसदृश आजाराचे पाच रुग्ण आढळून आले असले तरी अजूनही येथील काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ६ जानेवारी रोजी आरोग्य पथकाने भेट देऊन पोही येथे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. डेंग्यूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी गावात उपाययोजना राबवून तपासणी शिबिर घ्यावे, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे. साथ आटोक्यात असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे असले तरी सद्य:स्थितीत विविध साथरोगांचे अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे. तर डेंग्यूसदृश आजाराने ग्रासलेले तीन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या कालावधीत अकोला येथून साथरोग आरोग्य पथक गावात दाखल होणे गरजेचे होते तसे न होता स्थानिक बोर्टा व कुरुम प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक या गावात सर्वेक्षण करीत आहे. पथकाकडून गावकऱ्यांना आरोग्य शिक्षण देऊन, कोरडा दिवस व स्वच्छता पाळण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर कीटकजन्य आजाराच्या प्रतिबंधात्मक तथा उपचारात्मक कार्यवाहीच्या दृष्टीने प्रत्यक्ष भेटी दरम्यान गावातील दिव्या राजेश गवई (वय ७), सुमित कैलास चव्हाण (वय ७) हे खासगी रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाले, तर आशुतोष सुधीर मेतकर (वय १८), उज्ज्वल संजित नाईक (वय१४) व श्रद्धा राजू गुडधे (वय१४) हे तीन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावाची लोक संख्या १०८९ असून, आतापर्यंत ६३३ लोकांचे सर्वेक्षण केले आहे. २८२ घरे असून, १९१ घरांच्या पाण्याचे सर्वेक्षण केले आहे. त्यापैकी १४ घरात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या संपूर्ण गावात किरकोळ आजारी असलेले रुग्णसंख्या ११ असल्याचे आराेग्य विभागाने म्हटले आहे.
----------------------------------------
सद्य:स्थितीत डेंग्यू साथरोग आटोक्यात असून, केवळ दोन रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, गावात सर्वेक्षण करून आजारी लोकांचे रक्त नमुने घेतले. त्यात ६३३ लोकांची तपासणी केली आहे. आतापर्यंत पाच रुग्ण डेंग्यूसदृश आढळून आले आहेत. यापैकी काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
डॉ. सुधीर कराळे, तालुका आरोग्य अधिकारी, मूर्तिजापूर