महापालिका कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या शिक्षक समृध्दी पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी बुधवारी पतसंस्थेचे अध्यक्ष नरेश बाबुलाल मूर्ती यांच्यासह पाच संचालकांना मनपाच्या सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे.
महापालिकेच्या शिक्षक समृद्धि कर्मचारी पतसंस्थेत २०१२ ते २०१७ या कालावधीत अतिरिक्त भाग भांडवल, अनामत रक्कम काढणे, खोट्या नोटीसद्वारे रक्कम काढणे, खर्चाची देयके नसताना रक्कम अदा करणे, बोगस सभासद दाखवून रक्कम अदा करणे यासह लाखो रुपयांच्या आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे गहाळ केली जात असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. प्राप्त तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे लेखापरीक्षक विनायक तायडे यांनी लेखापरीक्षणात गैरव्यवहार झाल्याचा अहवाल तालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर केला होता. याप्रकरणी तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पतसंस्थेच्या अध्यक्ष, व्यवस्थापकासह दहा संचालकांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
या पाच जणांवर केली कारवाईपतसंस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष, व्यवस्थापक व संचालकांनी २३ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे अहवालात नमूद आहे. त्याअनुषंगाने मनपा प्रशासनाने पतसंस्थेचा अध्यक्ष तथा मनपा शिक्षक नरेश बाबुलाल मूर्ती, पतसंस्थेचे सदस्य तथा संचालक लेखा विभागातील सुनिता चारकोलू, सोनटक्के, अग्नीशमन विभागातील प्रकाश फुलंबरकर, शिक्षक शरद टाले यांच्यावर बडतर्फीची कारवाइ करण्यात आली.
मनपा कर्मचारी कारवाईच्या फेऱ्यातपतसंस्थेमध्ये सहभागी असणाऱ्या सदस्य व संचालकांमध्ये मनपा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाच्या कारवाईमुळे संबंधितांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.