अकाेला: शहरासह जिल्ह्यातील गावगुंडांना वठणीवर आणन्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘एमपीडीए’ व तडीपारीचे हत्यार उपसले आहे. शहराच्या विविध भागातील अट्टल व सराइत पाच गुन्हेगारांना तडीपार करण्याचा आदेश बुधवारी पाेलिस अधीक्षक सिंह यांनी जारी केला. पाेलिसांच्या कठाेर भूमिकेमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेल्या गुंडांच्या तंबुत घबराट पसरल्याचे बाेलल्या जात आहे.
जिल्ह्यात तसेच शहरात चाेऱ्या, लुटमार करणे, चाकुने गंभीर स्वरुपाच्या जखमा करणे, बळजबरीने पैसे हिसकावणे, बंदुकीचा धाक दाखवणे, शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना धमक्या देऊन पैसे उकळणाऱ्या गावगुंडांचा बंदाेबस्त करण्यासाठी पाेलिसांनी बाह्यावर खाेचल्या आहेत. ‘एसपी’बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार शहरातील रोहीत उर्फ सारंग गजानन (३२)रा. भारती प्लॉट जुने शहर, संतोष जगदीश यादव (२९)रा. पावसाळे ले-आउट कौलखेड, ऋषभ विलास रायबोले (२०)रा. आंबेडकर नगर नविन बस स्टैंड मागे, तुषार उर्फ चिकु आनंद लोंढे (२१)रा. शंकर नगर अकोटफैल तसेच विशाल देवलाल सदांशिव (२१)रा. कपीलवस्तु नगर शिवणी या आरोपींविराेधात दाखल गुन्हयांचे स्वरूप पाहता त्यांना मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (अ) (ब) अन्वये जिल्हयातुन तडीपार करण्यात आले आहे.