लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री/चतारी (अकोला): चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत चतारी येथील एकाच रात्री दुकानासह पाच घरफोड्या झाल्याची घटना १९ जुलै रोजी सकाळी उघडकीस आल्याने गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.चतारी येथील विलास कीर्तने यांच्या मालकीच्या हार्डवेअर दुकानातील रोख आठ हजार रुपये व साहित्य, रामेश्वर येनकर यांच्या किराणा दुकानातील रोकड व साहित्य, गणेश पुरी यांच्या घरातील पॅन्टच्या खिशातून ५६० रुपये, सुनील बोराळे यांच्या घरातील मिक्सर, कुकर, ब्लँकेट, शेषनारायण शेवलकार यांच्या घरातील तांब्याचे पाच गुंड आदी मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी घरांची, दुकानांची दारे तोडून लंपास केला. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक जयसिंग पाटील, पंजाबराव सिरसाट, अशोक इंगळे, पंचभाई यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या चोरीबाबत विलास कीर्तने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.