अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैदपुरा परिसरातील युवक गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला. या युवकांकडून सुमारे पाच किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या लाल बंगला परिसरात इब्राहीम खान महेबूब खान वय ३८ वर्षे हा त्याच्या राहत्या घरातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी पथकासह इब्राहीम खान मेहबूब खान याच्या घरावर पाळत ठेवली. त्यानंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास तो प्रतिबंधित गांजाची विक्री करीत असताना पथकाने त्याला गांजा विक्री करताना रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून सुमारे पाच किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या आरोपीविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकाने गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.