अकोला: तीन लाख रुपयांच्या बदल्यात पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखविल्याने तक्रारदार व्यक्ती त्यांच्या भुलथापांना बळी पडला. तक्रारदाराने तीन लाखांची रोख दिल्यावर आरोपींनी त्याला पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा देऊन त्याची फसवणूक केली. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बाळापुरातील छोटा मोबीनपुऱ्यात राहणारा नदीम अहेमद अब्दुल रशीद याला शुक्रवारी अटक केली.तक्रारदार व्यक्तीला बाळापुरातील काही आरोपींनी तीन लाख रुपयांच्या बदल्यात पाच लाख रुपये देतो, असे आमिष दाखविले. अधिकचे पैसे मिळत असल्याने, तक्रारदार त्यांच्या भुलथापांना बळी पडला आणि तक्रारदाराने बँकेतून तीन लाख रुपये काढून आणले. आरोपी नदीम अहेमद याच्यासह काही सहकाºयांनी त्याला पैसे घेऊन बाळापूर शहराबाहेर बोलाविले. तक्रारदार शहराबाहेर आल्यावर नदीम अहेमद व त्याच्या सहकाºयांनी त्याच्याकडून पैसे घेतले आणि त्याला पाच लाख रुपयांचे बंडल असलेली पिशवी दिली. तक्रारदाराने ही पिशवी उघडून बघितल्यावर नोटांच्या बंडलमध्ये वर १00 रुपयांची खरी नोट आणि खाली ‘भारतीय बच्चो का बँक’ असे लिहिलेल्या नोटा दिल्या. आपली फसवणूक झाल्याने तक्रारदाराने आरोपींविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुरुवारी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४२0 (३४) नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपास करून आरोपी नदीम अहेमद याला अटक केली. त्याच्याकडून चारचाकी वाहन, मोबाइलसह पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. नदीम याच्या इतर सहकाºयांचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक कैलास नागरे, एपीआय रामेश्वर चव्हाण, पीएसआय पंकज काकडे, एएसआय संजय देशमुख, गणेश पांडे, अजय नागरे, प्रमोद डोईफोडे, संतोष मेंढे, अश्विन सिरसाट, फिरोज खान, मंगेश मदनकार, अक्षय बोबडे आदींनी केली. (प्रतिनिधी)लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा!तीन लाखांच्या बदल्यात पाच लाख नोटा मिळत असल्याने, तक्रारदारानेसुद्धा मोठ्या आनंदाने आरोपींना तीन लाख रुपये रोख दिले; परंतु त्या बदल्यात आरोपींनी तक्रारदारास मुलांच्या खेळण्यातील बनावट १00 रुपयांच्या नोटा दिल्या. या नोटांच्या बंडलमध्ये वर खरी १00 नोट आणि खाली उर्वरित ‘भारतीय बच्चों का बँक’ लिहिलेल्या नोटा दिल्या.