अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनेत अकोट तालुक्यातील पिंप्री जैनपूर येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती पदाधिकाऱ्यांनी ५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड होत आहे. ती रक्कम वसूल करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने अंतिम नोटीस बजावल्याची माहिती आहे.नळ पाणीपुरवठा योजनेसाठी १७,५५,२५० रुपये शासकीय अनुदान मंजूर आहे. त्यापैकी १३,१७,०४५ रुपये अनुदान व लोकवर्गणीची १,९५,५०७ रुपये एवढी रक्कम ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या खात्यात जमा करण्यात आली. त्या रकमेतून समितीने पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले. कूपनलिका, पंपघर बांधकाम, उर्ध्ववाहिनी, पंपिंग मशिनरी, वीज जोडणी व साठवण टाकी बांधकाम बॉटम स्लॅबपर्यंत करण्यात आले. त्या कामाचे मूल्यमापन तांत्रिक सेवा पुरवठादाराकडून करण्यात आले. ते ८,५२,३७७ एवढे आहे. इतर खर्चासह ती रक्कम ९ लाख ३१,९५८ एवढी आहे. काम अपूर्ण असल्याने वरिष्ठांकडून सातत्याने पाठपुरावा झाला. त्यामुळे साठवण टाकीचा बॉटम स्लॅब, वॉलिंग, रूफ स्लॅबची कामे करण्यात आली. त्याचा खर्च मिळूनही १० लाख रुपये झाला. त्याचवेळी ५ लाख रुपये रक्कम समितीच्या खात्यात जमा असणे आवश्यक होते. त्याशिवाय, रकमेतून खरेदी केलेले कोणतेही साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे समितीने ५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले. ती रक्कम शासनजमा करण्याचे सातत्याने बजावण्यात आले. त्याशिवाय, फौजदारी कारवाईचा इशाराही नोटिसमधून देण्यात आला; मात्र ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीवर कोणताच फरक पडला नाही. त्यानंतर समितीने किरकोळ स्वरूपाचे काम केले. त्या कामाचे मूल्यांकन करून उर्वरित रक्कम शासनजमा करा, ती न केल्यास समिती सदस्यांवर फौजदारी कारवाई का करू नये, अशी अंतिम नोटीस पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आल्याची माहिती आहे.