अकोला : ताजनापेठ चौकात जनावरांची कत्तल करण्याच्या प्रकरणावरुन पोलिसांना घेराव घालण्यात आला होता. या प्रकरणामधील आणखी पाच जणांना रामदास पेठ पोलिसांनी बुधवारी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.ताजनापेठ चौकामध्ये गोवंश घेऊन येणाऱ्या वाहनावर कारवाईसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलिसांना येथील जमावाने अडविले होते. या घटनेनंतर परिसरातील शेकडो नागरिक पोलिसांच्या अंगावर धावून आले. तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर सर्वच ठाण्याच्या ठाणेदारांसह पोलिसांनी येऊन जमावाला पांगविले. मात्र, गोवंशाची कत्तल करणाऱ्यांनी पोलिसांना घेराव घातल्यानंतर काही वेळातच ही जनावरे गायब केली होती. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर रामदास पेठ पोलिसांनी यामध्ये दहा जणांवर गुन्हे दाखल केले. त्यातील दोघांना अटक करून त्यांना न्यायालयाने कारागृहात पाठविण्याचा आदेश दिला. बुधवारी अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधारांपैकी शेख सोहेल इब्राहीम खान याच्यासह शेख वाजीद शेख मुसा, इमाम खान सुभान खान, शेख मुस्ताक शेख बद्रु, मो. जावेद मो. अख्तर या पाच जणांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या पाचही जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे.
जनावरांच्या कत्तल प्रकरणी आणखी पाच जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2017 1:44 AM