संतोष येलकर
अकोला : गरजू मजुरांना वेळेवर कामे उपलब्ध करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) राज्यातील प्रत्येक गावांत पाच कामे तयार ठेवण्याचे परिपत्रक शासनाच्या नियोजन (रोहयो) विभागामार्फत २ सप्टेंबर रोजी काढले आहे. त्यानुसार तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्येक गावांत ‘नरेगा’ची पाच कामे तयार ठेवण्यात येणार आहेत.
मजुरांकडून कामाची मागणी होताच त्यांना ‘नरेगा’अंतर्गत कामे उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती आणि गावांत किमान पाच कामे तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसह उपलब्ध करून देण्याची कार्यवाही ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत करण्यात येणार आहे. तसेच गट ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात किमान निम्म्या गावांत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता असलेली प्रत्येकी पाच कामे उपलब्ध करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२१ असून, ग्रामपंचायती व गावांत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कामांमध्ये किमान ४० टक्के कामे सार्वजनिक स्वरुपाची असावी, अशा सूचनाही शासनाच्या नियोजन (रोहयो) विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकात देण्यात आल्या. त्यानुसार गरजू मजुरांकडून कामांची मागणी होताच त्यांना कामे उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावांत ‘नरेगा’अंतर्गत किमान पाच कामे तयार ठेवण्यात येणार आहेत.
प्रत्येक महिन्यात कामांची तपासणी;
रोहयो उपजिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
दरमहा उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी प्रत्येक महिन्यात संबंधित जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देऊन ग्रामपंचायती व इतर संबंधित यंत्रणांमार्फत ‘नरेगा’अंतर्गत तयार ठेवण्यात आलेल्या (शेल्फवरील) कामांची तपासणी करण्याचे निर्देशही शासनाच्या रोहयो विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकात देण्यात आले आहेत.
शासन परिपत्रकानुसार ‘नरेगा’अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावांत किमान पाच कामे तयार ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन मजुरांकडून मागणी प्राप्त होताच त्यांना कामे उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावांत पाच कामे तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदसह संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
-बाबासाहेब गाडवे,
उपजिल्हाधिकारी (रोहयो), अकोला.