पाचही आरोपींना २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
अकोला : कोरोनाच्या भीषण संकटामुळे अनेकांचे जीव जात असताना यावर उपाय म्हणून असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असताना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री अकोल्यातील पाच जणांना अटक केली. या पाचही आरोपींना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रामनगरातील एका मेडिकल स्टोअर्समधून कोरोनावर काही प्रमाणात उपायकारक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी सापळा रचून तसेच बनावट ग्राहकाद्वारे या गोरख धंद्यातील आरोपी आशिष समाधान मते याच्याकडून बिनादेयक, प्रिस्क्रिप्शनशिवाय रेमडेसिविर हे चार हजार रुपयांचे इंजेक्शन तब्बल २५ हजार रुपयांमध्ये विक्री करीत असताना त्याला ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात विक्री करणारे त्याचे साथीदार राहुल गजानन बंड (वय २६, रा. भारती प्लॉट, जुने शहर), सचिन हिंमत दामोदर (वय ३०, रा. अशोकनगर, अकोट फाइल), प्रतीक सुरेश शहा (रा. रामनगर) व अजय राजेश आगरकर (वय २५, रा. बाळापूर नाका) यांचाही सहभाग असल्याचे समोर आले. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचही आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात औषधी व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, औषधे किंमत नियंत्रण अत्यावश्यक वस्तू सेवा अधिनियम या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पाच आरोपींकडून तीन रेमडेसिविर इंजेक्शन तसेच एक लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी वाढणार
रेमडेसिविर इंजेक्शनचा राज्यभरात मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. अकोल्यात हे रेमडेसिविर इंजेक्शन काळ्याबाजारात तब्बल २५ ते ३० हजार रुपयांना विक्री करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या गोरख धंद्यातील पाच आरोपींना अटक केल्यानंतर आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
बडे आरोपी मोकाट; एफडीए सुस्त
रामनगरातील एका बड्या डॉक्टरच्या मालकीच्या मेडिकल स्टोअर्समधून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू होता; मात्र पोलिसांनी अद्यापही त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले नाहीत. अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारीही या बड्या धेंडांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ स्तरावरून दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. रेमडेसिविर अशा प्रकारे काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या बड्या धेंडांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्याची गरज आहे.