लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अँवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करणार आहे. लवकरच अकोला जिल्हा पातळीवरील सोहळा होणार आहे. त्यानंतर राज्यपातळीवरील सोहळा होईल. गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभार्यांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अँवॉर्ड-२0१७’ ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला आहे. गावाच्या विकासासाठी झटणार्या सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक, ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत. पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या अठरा जिल्ह्यांतून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. जनतेनेही उत्स्फूर्तपणे सरपंचांची नामांकने दाखल केली आहेत. त्यामुळे पुरस्कारांबाबत प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या अकरा कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करुन या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगिण काम करणार्या सरपंचासाठी ‘सरपंच ऑफ द ईयर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कार आहेत. असे एकूण तेरा पुरस्कार दिले जाणार आहेत. सुरुवातीला जिल्हा पातळीवर हे पुरस्कार दिले जातील. त्यानंतर या विजेत्यांचे राज्यपातळीसाठी नामांकन होईल. त्यातून राज्यातील आदर्श सरपंच ठरतील. राज्यात कोण आदर्श ठरणार? याची ग्रामीण महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता आहे. जिल्हास्तरावरील पुरस्कारांची निवड करण्यासाठी ‘लोकमत’ने समाजातील तज्ज्ञ व्यक्तींचे निरपेक्ष ज्युरी मंडळ स्थापन केले आहे. या ज्युरींमार्फत प्रत्येक नामांकनाची छाननी होऊन विजेत्यांवर मोहोर उमटवली जाईल. त्यामुळे विजेते कोण राहणार? हे सोहळय़ातच स्पष्ट होणार आहे.
‘लोकमत’ नेहमीच प्रयत्नपूर्वक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आघाडीवर राहिला आहे. यापूर्वी ‘लोकमत’ने राज्य विधिमंडळापासून ते देशाचे सर्वोच्च कायदेमंडळ असणार्या पार्लमेंटरी सदस्यांचा गौरव केला आहे. तळागाळातील व्यक्तींच्या आदर्श कार्याला ओळखून लोकशाहीला बळकटी देण्यासाठीच ‘लोकमत सरपंच अँवॉर्ड’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आपले गाव हाच आपला अभिमान आहे आणि इथेच आमची लोकशाही मूल्ये सर्वांत महत्त्वाची असली पाहिजेत. जय हिंद!-विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
भारतीय ट्रॅक्टर उद्योगात निर्विवाद नेता म्हणून आम्ही नेहमी कृषी उत्पादकता आणि ग्रामीण समृद्धी वाढविण्यासाठी नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित केले. ते शेतकर्यांपर्यंत पोहोचविले. शेतकर्यांशी असलेले आमचे नाते अधिक दृढ करण्यासाठी आम्ही लोकमतसोबत सरपंच पुरस्कार देण्यासाठी सहभाग घेतला आहे.- रवींद्र शहाणे, उपाध्यक्ष (पणन), महिंद्रा फार्म डिव्हिजन.
लोकमत सरपंच पुरस्कारासाठी राज्यभरातून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून आनंद झाला. असा अभूतपूर्व कार्यक्रम घेण्यात बीकेटी टायर्सला आनंद होत आहे. बीकेटी टायर्स मीडिया प्रमोशन आणि रोड शो यांचाही आम्हाला चांगला फायदा झाला आहे. आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांमध्ये लोकांची रुची वाढत आहे.-राजीव पोद्दार, सहव्यवस्थापकीय संचालक, बीकेटी टायर्स
पुरस्कारांसाठीचे जिल्हेअकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, रायगड, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत यावर्षी हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.
पार्लमेंट ते पंचायत ‘लोकमत’ने आदर्श खासदारांना गौरविण्यासाठी पार्लमेंटरी अँवॉर्ड सुरू केले आहेत. अशा प्रकारचा पुरस्कार सुरू करणारा ‘लोकमत’ हा पहिला माध्यम समूह ठरला आहे. संसद ते गाव हा प्रवास करत ‘लोकमत’ आता सरपंचांनाही गौरवित आहे. राज्यातील जनतेने या पुरस्काराचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.
सोहळय़ात होणार मंथन सरपंच अँवॉर्डच्या जिल्हापातळीवरील सोहळय़ास मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ग्रामविकास व पंचायतराजबाबत महत्त्वपूर्ण मंथन या सोहळय़ात घडणार आहे. जिल्हाभरातून सरपंच या सोहळय़ाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.
अकोला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद या पुरस्कार योजनेत अकोला जिल्ह्यात ग्रामपंचायतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या नामांकनात नामवंत ग्रामपंचायतींसह दुर्गम भागातील सरपंचांच्या नामांकनांचाही सहभाग आहे. यानिमित्ताने अनेक नवख्या गावांच्या यशोगाथाही समोर येणार आहेत.