अकोला: एका विवाहित महिलेला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या (प्रथम) न्यायाधीश मोनिका आरलॅन्ड यांनी शुक्रवारी पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.३२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार ती घरी जात असताना, आरोपी रूपेश श्रीकृष्ण काळे (२५) हा तेथे आला. त्याने विवाहितेचा विनयभंग केला आणि ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. विवाहितेच्या तक्रारीनुसार मूर्तिजापूर पोलिसांनी आरोपी रूपेश काळे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४(अ), ३५४(ड), ५0६, ३(१),(११) आणि अ.जा.ज.स.प्र का.नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकिशोर काळे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र (प्रथम) न्यायाधीश मोनिका आरलॅन्ड यांच्या न्यायालयात सरकारपक्षाने चार साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद व नोंदविलेल्या साक्ष, पुराव्यानुसार आरोपी रूपेश काळे याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. न्यायालयाने त्याला कलम ३५४ (अ) मध्ये तीन वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी, कलम ३५४(ड)मध्ये तीन वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी, कलम ५0६ मध्ये दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी शिक्षा सुनावली. तसेच कलम ३(१),(११) आणि अ.जा.ज.स.प्र का.मध्ये पाच वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंड, न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागणार आहेत. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी विधिज्ञ राजेश अकोटकर यांनी बाजू मांडली.
विवाहितेचा विनयभंग; पाच वर्षांचा सश्रम कारावास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 1:17 PM