हिवरखेड मार्गावरील फिजा धाब्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या बालकामगार आदिवासी बालकाला चटके देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. ५ डिसेंबर २०१८ रोजी घडली होती. या अल्पवयीन मुलाची हत्या केल्याच्या आरोपाखाली फिरोज खान अकबर खान, सलीम खान अकबर खान, ईमरान खान अकबर खान, अकबर खान जब्बार खान सर्व (रा.इंदिरानगर, अकोट) या चार आरोपींविरुद्ध खटला सुरू आहे. या प्रकरणात दोन आरोपी घटनेपासून कारागृहात, तर दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयात या प्रकरणात साक्षीदारांचे बयान नोंदविण्यात आले असून, दि. ३ मे रोजी अंतिम युक्तिवाद संपला आहे. या हत्याकांडाचे निकालाची सुनावणी १२ मे रोजी ठेवण्यात आली आहे. या हत्याकांडातील साक्षीदारांनी सी.आर.पी.सी. कलम १६१ व
कलम १६४प्रमाणे न्यायालयसमक्ष बयान नोंदविले होते. न्यायालयात या सुनावणी दरम्यान साक्षीदारांच्या साक्ष सरकारपक्षातर्फे नोंदविण्यात आल्या, परंतु सहा साक्षीदार फितूर झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी कार्यवाही होण्यासाठी न्यायालयाने आदेश द्यावा, अशी मागणी करीत सरकारी वकील अजित देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सुद्धा १२ मे रोजी सुनावणी होणार आहे. याप्रकरणात न्यायालयात
सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख, तर आरोपीतर्फे ॲड. मोहन मोयल, ॲड. दिलदार खान, ॲड. अंजुम काझी, ॲड. मनोज वर्मा काम पाहत आहेत.