अकाेल्याचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वराला श्रावण महिन्यातील शेवटच्या साेमवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. काेराेना विषाणूचे सावट लक्षात घेता गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा प्रशासनाने फक्त श्रीराजेश्वराच्या मानाच्या पालखीला परवानगी दिली हाेती. प्रशासनाच्या आदेशाने नाराज न हाेता कावड व पालखी महाेत्सवाची आतुरतेने वाट पाहणारे शिवभक्त श्रीराजेश्वराच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले हाेते. नियाेजित वेळेनुसार रविवारी रात्री ११.४० वाजता राजेश्वराच्या मंदिरातून निवडक ३५ शिवभक्तांच्या उपस्थितीत पालखीचे गांधीग्रामकडे प्रस्थान झाले. सकाळी ५.५० वाजता अकाेटफैल परिसरातील मनपाच्या आयुर्वेदिक दवाखान्याजवळ पालखीचे आगमन झाले. यावेळी श्रीराजेश्वराच्या पालखीचे शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
फुलांची उधळण अन् सुंदर रांगाेळी!
काेराेनाचे सावट असले तरीही श्रीराजेश्वराप्रति अकाेलेकरांची निस्सीम श्रध्दा, आस्था कायम असल्याचे साेमवारी पाहावयास मिळाले. अकाेटफैल, छत्रपती शिवाजी पार्क, मानेक टाॅकीज राेड, त्रिवेणेश्वर मंदिर परिसर, रयत हवेली चाैक तसेच टिळक राेडवर शिवभक्तांनी मानाच्या पालखीवर फुलांची उधळण केली. यावेळी अतिशय सुंदर रांगाेळ्या काढण्यात आल्या हाेत्या.
स्थानिक मंदिरांमध्ये जलाभिषेक
दरवर्षी कावड व पालखी काढणाऱ्या माेठ्या शिवभक्त मंडळांनी श्री राजेश्वराच्या मंदिर परिसरात गर्दी न करता स्थानिक मंदिरांमध्येच जलाभिषेक करणे पसंत केले. काही चिमुकल्या शिवभक्तांनी मंदिराच्या मागील बाजूस पालख्या आणत मंदिराच्या पायऱ्यांवर आस्थेने डाेके टेकवल्याचे पाहावयास मिळाले.
बंदाेबस्ताच्या नावाखाली अतिरेक
जिल्हा प्रशासनाने कावड व पालखी महाेत्सव रद्द केल्याचा निर्णय नाराजीने का असेना शिवभक्तांनी मान्य केला. शेवटच्या साेमवारी पाेलीस प्रशासनाने बंदाेबस्ताच्या नावाखाली अतिरेक केल्याचे चित्र हाेते. संभाव्य गर्दी टाळण्यासाठी पाेलिसांनी मंदिराच्या चारही बाजूने बॅरिकेड उभारून सर्व दुकाने बंद केली. लाेखंडी पूल ते थेट किल्ला चाैक, विठ्ठल मंदिरालगतचे सुविधा मेडिकल, जय हिंद चाैक बंद करण्यात आला हाेता.
शहराच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेला जाेपासणाऱ्या कावड व पालखी उत्सवाला यंदा ७७ वर्षे पूर्ण झाली. काेराेनामुळे हा उत्सव रद्द करण्यात आला असला तरीही अकाेलेकरांनी माेठ्या श्रध्देने श्रीराजेश्वराच्या पालखीचे स्वागत केले. काेराेनाची इडा, पीडा टळाे, हीच मनाेकामना आहे.
- चंद्रकांत सावजी, अध्यक्ष श्रीराजराजेश्वर शिवभक्त मंडळ