अकोला: शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधीचा ओघ सुरू असला, तरी रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याचे सोशल आॅडिटच्या माध्यमातून उघडकीस आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामात संबंधित अधिकारी, अभियंते व कंत्राटदारांनी संगनमताने हात ओले केल्यामुळे शहरातील विकास कामांना भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे चित्र आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच मनपा प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेले सिमेंटचे रस्ते दर्जाहीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गुणनियंत्रण जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रयोगशाळा इत्यादी तीन यंत्रणांमार्फत रस्ते कामांचे २२ ते २७ जुलै २०१८ दरम्यान सोशल आॅडिट केले. रस्ते कामांच्या सामाजिक आणि तांत्रिक अंकेक्षणाच्या (सोशल आॅडिट) अहवालात संबंधित यंत्रणांचे पितळ उघडे पडले. एकूणच चित्र पाहता शहर विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून कोट्यवधींचा निधी दिला जात असला, तरी दुसरीकडे संबंधित यंत्रणांच्या भ्रष्ट कारभारामुळे विकास कामांचे तीनतेरा वाजल्याचे समोर आले आहे.या सिमेंट रस्त्यांचे पितळ उघडे!* मुख्य पोस्ट आॅफिस ते सिव्हिल लाइन चौक* दुर्गा चौक ते अग्रसेन चौक* टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक* माळीपुरा ते मोहता मिल* अशोक वाटिका ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय* नेहरू पार्क चौक ते महापारेषण कार्यालय
निधीचा पूर; पण विकास कामांना भ्रष्टाचाराची वाळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 1:21 PM