अकोट: कोरोना संचारबंदीमुळे मान्यताप्राप्त दारू दुकाने बंद आहेत. परिणामी, मद्यपी हातभट्टीच्या दारूकडे वळले आहेत. गावात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळली जात असून, प्रत्येक गावात ही दारू सहज उपलब्ध होत आहे.
--------------------------
भाजीबाजारात गर्दी; धोका वाढला!
वाडेगाव: येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. रविवारी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत भाजीबाजार भरला. मात्र, या ठिकाणी कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. ग्राहकही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाहीत.
----------------------------
काजळेश्वर येथील एकाचा मृत्यू
बार्शिटाकळी: तालुक्यात काजळेश्वर येथे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, तरीही नागरिक बिनधास्त नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी एका ६५ वर्षीय महिला रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
---------------------
पातूर तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक
पातूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फायदा घेत, पातूर तालुक्यातील नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
--------------------------
बाळापूर तालुक्यात २६ कोरोना पॉझिटिव्ह!
बाळापूर: तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, नागरिकांची चिंता वाढली आहे. बुधवार, दि. २६ मे रोजी प्राप्त अहवालानुसार, आणखी २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
---------------------------
बाळापूर तालुक्यात भुईमूग काढणीस प्रारंभ
बाळापूर: तालुक्यातील ग्रामीण भागात भुईमुगाचा पेरा वाढलेला असून, सद्यस्थितीत भुईमूग काढणीला सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू असून, मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.
------------------------------------------
प्रवासी निवाऱ्यात वाढले अतिक्रमण
अकोला : उगवाफाटा येथील प्रवासी निवारा सध्या शोभेची वास्तू बनला असून, प्रवासी निवाऱ्यात अतिक्रमण वाढले आहे. बऱ्याच गाड्यांचा थांबा असल्यामुळे नवथळ, पाळोदी येथील प्रवाशांना प्रवासी निवाऱ्याबाहेर उभे राहत असल्याचे चित्र आहे.