हातरूण : खरीप हंगामात मोर्णा नदी व नाल्यांना पूर आल्याने हातरूण परिसरात शेतजमीन मोठ्या प्रमाणात खरडून गेली. हजारो एकर क्षेत्रावरील पिकांची प्रचंड हानी झाली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करावी, अशी मागणी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी केली आहे.
यावर्षी हातरूण परिसरात पेरणी उशिरा झाली. मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी पीक जगवले; मात्र जुलै महिन्यात आलेल्या मोर्णा नदी व नाल्याच्या पुराने शेतातील उभ्या पिकाला तडाखा बसला. नदी आणि नाल्याच्या पुराने शेतात असलेली पिके पाण्याखाली गेली. शेती खरडून गेली असून शेतात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सतत संकटाचा सामना करणारा शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी भाजप नेते नारायणराव गव्हाणकर, माजी पंचायत समिती सदस्य मंजूर शाह, माजी सर्कलप्रमुख गजानन नसुर्डे, बंडूभाऊ गावंडे, प्रवीण बोर्डे, राजेश काळे, गणेश आढे, संजय घंगाळे, अमित काळे, सुधाकर बोर्डे, संतोष गव्हाळे यांनी केली आहे.
------------
मोर्णा नदीला पूर आला की शेतातील पिकाला पुराचा तडाखा बसतो. पुलावरून पुराचे पाणी वाहते. त्यामुळे रस्ता बंद होतो. यावर्षी आठवडी बाजारापर्यंत पूर आला होता. पुरामुळे पिकाची मोठी हानी झाली. मोर्णा नदीचे खोलीकरण तत्काळ करण्याची गरज आहे.
- वाजीद खान, सरपंच, हातरूण
----------------
पावसामुळे हातरूण परिसरात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे दुर्दशा झालेले रस्ते अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहेत. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून वाहन घसरण्याच्या घटना घडत आहेत. दुर्दशा झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
- महेश बोर्डे, सरपंच, शिंगोली
---------
या भागात नुकसान
हातरूण, दुधाळा, शिंगोली, मालवाडा, मंडाळा, लोणाग्रा, हातला, मांजरी, अंदुरा भाग एक आणि अंदुरा भाग दोन परिसरात पूर व पावसामुळे शेतजमिनीवरील पिकांची मोठी हानी झाली आहे. शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. पुरामुळे जमीन खरडून जाऊन शेतात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सर्वत्र गाळ साचलेला असल्याने या शेतात दुबार पेरणी करता येत नाही. मागील तीन ते चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती, नापिकी यामुळे शेतकऱ्यांसमोरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.