आगर : परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे लेंडी मोळखंड व चोंडा नाल्याला पूर आल्याने आगर-हातरुण रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली होती. या मार्गावर सुमारे चार तास वाहतूक बंद असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
परिसरात खरीप हंगामातील पिके शेतात बहरली असून, शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. दुपारच्या सुमारास अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह मजुरांची तारांबळ उडाली होती. पाऊस जोरदार कोसळल्याने परिसरातील लेंडी नाल्यासह मोळखंड व चोंडा नाल्याला पूर आला होता. मोळखंड नाल्याच्या पुलावरून तब्बल चार ते पाच फूट पाणी वाहत होते. त्यामुळे हातरुण, लोणाग्रा, हातला, पाळोदी, गोत्रा, खांबोरा, मंडाळा, दुधाळाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक ठप्प पडली होती. आगरकडे येणाऱ्या वाहनांसह शेतकऱ्यांसह चार ते पाच तास ताटकळत पडले होते.
-------------------------
पुलाची उंची वाढविण्याची मागणी
आगर-हातरूण मार्गावर लेंडी मोळखंड व चोंडा नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने पूर आल्यास नेहमीच वाहतूक ठप्प पडते. पुलाची उंची वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.