अकोला : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कुंभारी येथील लोणार नदीला दि. २२ ऑगस्ट व दि. ६, ७ व ८ सप्टेंबर रोजी झालेल्या संततधार पावसामुळे दोनवेळा पूर आला. नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्याने शेकडो एकरांवरील पिकांचे नुकसान झाले असून, जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. यासंदर्भात कृषी सहायक नागेश खराटे यांना विचारले असता नुकसानीबाबत माहिती नसून, अद्याप एकाही शेतकऱ्याने तक्रार केली नसल्याची माहिती त्यांनी दिली.
कुंभारी गावातील १४० हेक्टर, मासा गावातील १०५ हेक्टर, सिसा उदेगावातील ६७ हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली, असा अहवाल शासनदरबारी पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात या परिसरातील शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नदीवर १५० एकरमध्ये असलेले लोणार सरोवर तुडुंब भरले आहे. लोणार सरोवर ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने सांडव्यामधून सरोवरातील मासोळ्या मोठ्या प्रमाणात वाहून गेल्या असल्याने मस्त्य व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. लोणार नदीलगत येवता, कुंभारी, डोंगरगाव, सिसा, मासा, बोंदरखेडा, आदी गावांचा समावेश होतो. पुराचे पाणी शेतात शिरल्याने दुसऱ्यांदा पिकांचे नुकसान झाले आहे. या भागात त्वरित सर्व्हे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
--------------
कुंभारी गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत मिळाली नाही. याभागात सर्व्हे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी.
-गजाननराव आखरे, अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटी, कुंभारी.
-------------------------
...अन्यथा आंदोलन
लोणार नदीला दुसऱ्यांदा आलेल्या महापुरामुळे या परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने या परिसरातील शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, तसेच यासंदर्भात डोळेझाक करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करावे लागणार, असा इशारा कुंभारी सर्कलचे शिवसेनेचे अकोला पंचायत समितीचे सदस्य विजय बाभूळकर यांनी दिला आहे.