२१ जुलै रोजी रात्री अचानक पावसाने रौद्ररूप धारण केले. सतत रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने नदी, नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने सोनाळा गावातील झोपडपट्टी भागात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे घरातील अन्नधान्य पाण्यात वाहून गेले. याशिवाय विझोरा येथे नाल्याच्या काठावरील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संजय शिंदे यांचा शेतातील स्प्रिंकलर संच, शेती उपयोगी साहित्यसुद्धा पुरात वाहून गेले. शेतातील पिके खरडून गेली. एरंडा शिवारातील श्रीकृष्ण शिंदे, अनिल चौधरी, परंडा येथील सै. रफिक सै. रशीद यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले. कातखेड, सराव, येवता, पिंपळखुटा आदी गावातील शेतीला पुराचा मोठा फटका बसला आहे.
फोटो:
गाय, कोंबड्या मृत्युमुखी
लक्ष्मण पाटोळे यांची गाय, कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. तसेच मोहन इंगळे यांच्या घराचे नुकसान झाले. विलास अंभोरे, कैलास अंभोरे, अरुण जाधव, किरण शेलारे, रवी गवई, शरद जाधव, गजानन गवई, लक्ष्मण पाटोळे, अजय पाटोळे, किशोर गवई, बाळू डोंगरे, प्रकाश गोपनारायण, किशोर खडे आदींच्या घरांमध्ये पाणी गेल्याने विस्थापित झाले. परिस्थितीची पाहणी गुरुवारी जि. प. सदस्या शोभा इंगळे यांनी सोनाळा येथे जाऊन केली. त्यांना तात्पुरती जेवणाची व राहण्याची सोय जिल्हा परिषद शाळेत करण्यात आली. सरपंच भटकर यावेळी उपस्थित होते.