अकोला : निर्बंध हटल्याने फूल व्यवसायाचे अर्थचक्र पुन्हा सुरू झाले आहे. त्यात सणासुदीचा काळ असल्याने आणखी गती मिळाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात फूल बाजारात दररोज ३०-४० क्विंटल फुलांची उलाढाल होत होती. त्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांसह विक्रेत्यांनाही दिलासा मिळाला असून, नवरात्रोत्सवातही मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे फुलांचा व्यवसाय चांगलाच अडचणीत सापडला होता. सुरुवातीला चार-पाच महिने लाॅकडाऊनमध्ये फुलाला कोणी खरेदीदार नसल्याने शेतकऱ्यांनी फुले फेकून दिली होती. मध्यंतरी काही दिवस अर्थचक्राची गाडी रुळावर आल्याने फुले विक्री वाढली; परंतु पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने कठोर निर्बंध लावले होते. त्यामुळे धार्मिक उत्सव, लग्न सोहळे, कार्यक्रम, मंदिरे बंद झाली. यामुळे फुलांची मागणी थांबली होती. फुलांचा व्यवसाय करणारे व्यापारी आणि फूल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले होते. परंतु आता फुलांचा व्यवसाय पुन्हा बहरू लागला आहे. सुरुवातीला श्रावण महिना, पाठोपाठ गणोशोत्सव, महालक्ष्मी उत्सवामुळे बाजारात फुलांची मागणी वाढली होती. या काळात विक्रेत्यांनीही चांगला व्यवसाय केला. सध्या पितृपक्ष सुरू असल्याने फुलांची मागणी घटली आहे.
गणेशोत्सवातील फुलांचे दर
गुलाब १००-१५० रु. किलो
चायनीज गुलाब १००-१५० रु. बंडल
लिली १००-१५० रु. किलो
निशीगंध १००-१५० रु. किलो
गिलाडी १५०-२०० रु. किलो
जरबेरा ३० रु. बंडल
जिल्ह्यात फुलविक्रेता
११२
जिल्ह्यातील फुलक्षेत्र
१२३० हेक्टर
जालना, हिंगोलीची फुले अकोल्यात
यंदा निर्बंध नसल्याने जालना, हिंगोली, वाशिम, अमरावती जिल्ह्यांतील फुलांचा माल अकोल्यातील बाजारात आला होता. त्यामुळे थोडा दर कमी होता. तसेच अमरावती, दर्यापूर या जिल्ह्यात अकोल्यातील फुले जात असल्याचे अडत व्यावसायिकांनी सांगितले.
कोरोनामुळे फुलांचा व्यवसाय निम्म्यापेक्षा जास्त घटला होता. आता निर्बंध हटल्याने फुलांची मागणीही वाढली आहे. फुलांना चांगला दर मिळत आहे. नवरात्रोत्सवातही फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याचा अंदाज आहे.
- नीलेश फुलारी, अडत दुकानदार
शेतकरी म्हणतात...
मागील १५ वर्षांपासून फूल शेती करीत आहे. कोरोना काळात गाडी भरून बाजारात घेऊन जाण्यासाठी परवडत नव्हते. मजुराचा खर्चही निघत नव्हता. आता निर्बंध हटल्याने फुलांची मागणी वाढली आहे.
- उमेश फुलारी, शेतकरी, पातूर
गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री केली. यामध्ये झेंडूच्या फुलांना चांगली मागणी होती. सध्या पितृपक्ष असल्याने मागणी कमी आहे. परंतु नवरात्रोत्सवात आणखी मागणी वाढणार आहे.
- विश्वनाथ इंगळे, शेतकरी, पातूर