अकोला: मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून नावलौकिक मिळत असलेल्या अकोला रेल्वेस्थानकावर साडेतीन कोटी रुपये खर्च करून १८ फूट रुंदीचा नवा भव्य एफओबी रॅम्प उभारला जात आहे. या एफओबीच्या कामास प्रारंभ झाला असून, लवकरच तो पूर्णत्वास येणार असल्याचे संकेत आहे. यासोबतच अकोला रेल्वेस्थानक परिसरात स्वयंचलित जिन्याचे बांधकामही लवकरच सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.आरओबी कोसळल्याच्या घटनेनंतर देशभरातील जुन्या आरओबींचे सर्व्हे रेल्वे विभागातर्फे करण्यात आले. त्यात अकोला रेल्वेस्थानकावर ब्रिटिशकालीन ब्रिजला ८० वर्ष झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे अकोला रेल्वेस्थानकावरील तिकीटघरालगत असलेला जुना ब्रिज पाडून नवा एफओबी रॅम्प उभारण्याचे निर्देश मध्य रेल्वे मंडळाने दिले. त्यानुसार अकोला स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक २-३, आणि ४-५ वर १२ बाय १२ चे मोठे खड्डे खोदल्या गेले आहेत. १४० मीटर लांबीच्या या एफओबीला साडेतीन कोटींच्या खर्चांतून उभारले जात असून, आठ महिन्यात हे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे एडीआरएम मनोजकुमार यांनी सांगितले. १८ फूट रुंद असलेल्या या एफओबी रॅम्पचे बांधकाम संपूर्णपणे लोखंडी गडरने होणार आहे. अद्यावत आणि मजबूत भार क्षमतेचा हा ब्रिज राहणार असल्याचे बोलले जात आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे बांधकाम सुरू आहे. मंदिराजवळील एफओबीचादेखील विस्तारनवीन एफओबीच्या उभारणीसोबतच हनुमान मंदिराजवळील ९९-२००० मध्ये उभारलेल्या ब्रिजचा विस्तारही केला जाणार आहे. लिफ्टशी जोडलेल्या या ब्रिजवरून आधी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ पर्यंतच जाता येत असे; मात्र नवीन विस्तारात हा ब्रिज आता प्लॅटफार्म क्रमांक ६ आणि ७ ला जोडला जाणार आहे. त्यामुळे अकोट फाइलच्या दक्षिणमध्य रेल्वेस्थानकाशी जुळणार आहे. नांदेड मध्य रेल्वे मंडळाच्या अधिकाºयांनी नुकताच याला मंजुरी दिली असून, त्या कामालादेखील लवकरच सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अकोला रेल्वेस्थानकावर उभारला जातोय साडेतीन कोटींचा 'एफओबी रॅम्प'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 2:08 PM