लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सदुपयोग करीत मध्य रेल्वेने २३ ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू केले असून, यामध्ये भुसावळ विभागातील अकोला, शेगाव व नांदुरासह १० रेल्वेस्थानकांवरील ‘एफओबी’च्या कामांचा समावेश आहे.मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली तेव्हापासून, आवश्यक वस्तू अखंडितपणे मिळण्यासाठी मालवाहतूक, तसेच संपूर्ण भारतभर निवडक विशेष प्रवासी गाड्या चालविण्याव्यतिरिक्त मध्य रेल्वेने लॉकडाऊन कालावधीचा उपयोग करून महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा कामे पूर्ण केली आहेत.या केलेल्या कामांच्या प्रमाणात वाहतूक अवरोधांची अनेकदा आवश्यकता भासली असती, तसेच सामान्य काळात चालणाऱ्या काही गाड्यांवरही त्याचा परिणाम झाला असता. लॉकडाऊनपासून १४ पादचारी पुलांचे स्टील गर्डर उभारण्यासाठी आणि ९ पादचारी पुलांचे जुने स्ट्रक्चर काढून टाकण्याकरिता मध्य रेल्वेच्या २३ ठिकाणी पायाभूत सुविधांचे काम करण्यात आले. या २३ महत्त्वपूर्ण पायाभूत कामांमध्ये मुंबई विभागातील ७, भुसावळ विभागातील १०, नागपूर व सोलापूर विभागात प्रत्येकी एक, पुणे विभागातील ३ आणि निर्माण शाखेतील एक काम होते.
अशी आहेत भुसावळ विभागातील कामेअकोला स्थानकात जुन्या ‘एफओबी’ऐवजी ६ मीटर रुंदीच्या नवीन ‘एफओबी’च्या गर्डर उभारणीची सुरुवात करण्यात आली. भुसावळ स्टेशनवर जुना ‘एफओबी’ बदलून त्याऐवजी नवीन ४.८८ मीटर रुंद ‘एफओबी’ गर्डरची उभारणीचे कार्य सुरू करण्यात आले. बोदवड स्टेशनवर ३.६६ मीटर रुंदीचा ‘एफओबी’, नवीन अमरावती येथे एक पादचारी पुलाच्या गर्डरची उभारणी सुरू करण्यात आली. याशिवाय चांदूर बाजार स्टेशन, अमरावती स्थानक, नांदुरा स्टेशनवर ३.६६ मीटर रुंदीच्या पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीची सुरुवात करण्यात आली, तसेच भुसावळ, नाशिक रोड आणि शेगाव स्थानकांवर जुन्या पादचारी पुलाचे जुने नालीदार स्टील स्ट्रक्चर्स काढून टाकण्यात आले.