- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्य स्तरावर विरोधी पक्षातील नेत्यांचे भाजपमध्ये सुरू असलेल्या ‘इनकमिंग’चे लोण आता स्थानिक पातळीवरही येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने ६ आॅगस्ट रोजी अकोल्यात येत असल्याने त्यांच्या सभेत अकोला व वाशिममधील काही नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण सध्या तापले असून, उमेदवारीसाठी इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षांना घुमारे फुटले आहेत. त्यामुळे उमेदवारी हा कळीचा मुद्दा ठरणार असून, उमेदवारीपासून वंचित राहणारे दुसऱ्या पक्षाचा आधार घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अकोल्यात पाच विधानसभा मतदारसंघ असून, यापैकी चार मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत, तर उरलेल्या बाळापूर मतदारसंघात उमेदवारीची मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या कोणत्याही नेत्याला भाजपमध्ये जाण्यात मर्यादा आहेत, अशा पृष्ठभूमीवर दुसºया फळीतील नेते व प्रभावी कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील काही सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवेळी भाजपमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता आहे.
विधानसभेसाठी अडचण; जिल्हा परिषद लक्ष्यभाजपचा वाढता प्रभाव पाहता विरोधी पक्षातील अनेकांना भाजपमध्ये जाण्याची इच्छा असली तरी अकोल्यात ‘विधानसभेची उमेदवारी’ देण्यामध्ये भाजपसमोर मर्यादा आहेत; मात्र आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वेधही सुरू झाले आहे, त्यामुळे मिनी मंत्रालयात जाण्यास इच्छुक असलेले भाजपचा मार्ग धरण्याची शक्यता आहे.
काही नेते प्रवेशाच्या उंबरठ्यावरअकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांतील काही नेते भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा भाजपच्या गोटातून केला जात आहे. आपल्या पुत्राच्या राजकीय पुनर्वसनासाठी एक ज्येष्ठ नेतृत्व भाजपात येऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे, तर कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी गेल्या आठवड्यात अकोला व वाशिममध्ये केलेल्या दौºयात अशा नेत्यांसोबत गुफ्तगू झाल्याचीही चर्चा आहे.