अकोला : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर आगामी काळात येणारे सण, उत्सव त्या-त्या लोकांनी साजरे करताना कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने घालून दिलेले नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नुकताच आपल्या जिल्ह्यात बाधित रुग्ण संख्येचा आकडा वाढला होता. हा धोका पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी आपण साऱ्यांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यातही उत्सवाच्या काळात ही काळजी अधिक घ्यावी, असे आवाहन जल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.दुर्गोत्सव, ईद ए मिलाद व धम्मचक्र प्रवर्तन दिन या सणांच्या पार्श्वभूमिवर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात विविध सामाजिक कार्यकर्ते व दुर्गोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उप-जिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, लगेचच दिवाळीसारखा मोठा सणही येऊ घातला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घ्यावी. शासनाच्या नियमावलीचे पालन करावे, मास्कचा वापर करावा. परस्परांमध्ये अंतर राखावे व सॅनिटायझरचा वापर करा, साबणाने हात वारंवार धुवा, असे आवाहन त्यांनी केले.बैठकीच्या प्रारंभी निवासी उप-जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी प्रास्ताविकात शासनाकडून दुर्गोत्सव साजरा करण्याबाबत प्राप्त नियमावलीचे वाचन करून दाखवले, तसेच पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तसेच मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपली मते व्यक्त केली.