मोबाइलचा अतिवापर ठरतोय धोकादायक
अकोला : लॉकडाऊननंतर शालेय अभ्यासक्रम ऑनलाइन झाल्याने विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढला. अभ्यासासोबतच विद्यार्थी यू-ट्यूब, मोबाइल गेम्ससाठी तासन्तास मोबाइलवर असतात. त्यामुळे स्क्रीनवरील ब्लू लाइट डोळ्यांवर पडत असून, तो डोळ्यांसाठी हानिकारक ठरत आहे. त्यामुळे दहा ते वीस टक्के नेत्र रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
मोकाट श्वानांचा सुळसुळाट
अकोला : शहरातील विविध भागात मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला असून, रात्रीच्या वेळी हे श्वान वाहनधारकांच्या मागे धावत आहेत. त्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, महानगरपालिकेचा कोंडवाडा विभाग कार्यान्वित नाही. महापालिकेने कोंडवाडा विभाग कार्यान्वित करून मोकाट श्वानांचा बंदोबस्त लावावा, अशी मागणी होत आहे.
अशोक वाटिका चौकात वाहतुकीची कोंडी
अकोला : रेल्वेस्थानक मार्गावर उड्डाणपूल निर्मितीचे कार्य सुरू आहे. या मार्गावरून सर्वसाधारण वाहतुकीसह जड वाहनांचीही वाहतूक सुरू असते. त्यामुळे दुपारच्या वेळी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. विशेषत: अशोक वाटिका चौकात दुपारच्या वेळी नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथ गतीने
अकोला : डाबकीरोड येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. या मार्गाचे निर्माण कार्य आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कोविड ओपीडीत गर्दी वाढली
अकोला : सप्टेंबर महिन्यानंतर सर्वोपचार रुग्णालयातील कोविड ओपीडीमध्ये चाचणीसाठी येणाऱ्या संदिग्ध रुग्णांची गर्दी कमी झाली होती. मात्र, दिवाळीनंतर ही गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. शिवाय, याच ठिकाणी रुग्णांना अहवाल देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अहवालासाठी रुग्णांना होणारा त्रास कमी झाला आहे.
बेफिकिरीमुळे वाढला कोरोनाचा धोका
अकोला : वातावरण बदलामुळे संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठेतील नागरिकांची बेफिकिरी कोरोनाच्या फैलावाला निमंत्रण देत आहे. या प्रकारावर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज असून, सुपर स्प्रेडर व्यक्तींची तपासणी करत आहे. मात्र अनेकजण तपासणीसाठी नकार दर्शवित असल्याचे चित्र आहे.