अकोला: अवघ्या महाराष्ट्रात फुटबॉल विश्वात ‘फुटबॉलचे भीष्माचार्य’ म्हणून ओळखल्या जाणारे अकोल्यातील ज्येष्ठ फुटबॉलपटू अत्ताउर रहेमान कुरेशी यांचे ११ जानेवारी रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.११ एप्रिल १९२७ रोजी जन्मलेले अत्ताउर यांनी अकोला येथील सावतराम मिल फुटबॉल संघापासून फुटबॉल खेळाची सुरुवात केली. यानंतर नागपूर येथील यंग मुस्लीम क्लबमध्ये खेळले. याकाळात त्यांची एवढी ख्याती होती, की त्यांचा सामना कोणत्याही गावात असो त्यांचा चाहतावर्ग मैदानात गर्दी करीत असे. नागपूरला सामना असला, की त्यांचा चाहतावर्ग प्रेक्षक गॅलरीत त्यांचे फोटो घेऊन येत असे. मैदानात त्यांचे फोटो लावत होते. यंग मुस्लीम क्लबमधूनच त्यांनी राष्ट्रीय संघात प्रवेश घेतला होता.त्यानंतर त्यांना महाराष्ट्र परिवहन महामंडळ, अकोला विभाग येथे चालक (ड्रायव्हर) म्हणून नोकरी लागली. महाराष्ट्र एस.टी. फुटबॉल संघाचे ते कर्णधार होते. पुढे त्यांनी ग्रीन स्पोर्टस् क्लबची स्थापना करू न अनेक राष्ट्रीय फुटबॉलपटू घडविले. याच दरम्यान ते यंग मुस्लीम क्लब अकोलाकडून काही काळ खेळले. सोबतच फ्रेन्डस क्लबचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले. फुटबॉलसाठी संपूर्ण आयुष्य अताउर यांनी खर्ची केले. फुटबॉलकरिता त्यांचे एवढे वेड होते, की एस.टी.चालक सेवेत असताना एके ठिकाणी फुटबॉलचा सामना सुरू असताना, त्यांनी प्रवासी बस थांबवून सामना पूर्ण बघितला, हा किस्सा अनेकवेळा ते हसून सांगत होते. तसेच जेव्हा त्यांचे वडील वारले होते. तेव्हा ते एका सामन्यात पंच म्हणून काम पाहत होते. वडील वारल्याचा निरोप त्यांना सामना सुरू असताना मिळाला होता. मात्र, त्यांनी सामना अध्र्यावर न सोडता, सामना पूर्ण झाल्यानंतर पंचाची जी जबाबदारी असते, ते सोपस्कार पूर्ण पार पाडून मगच घर गाठले होते. अशा अनेक आठवणी आज त्यांच्या निधनानंतर ताज्या झाल्या. वयाची नवदी गाठल्यानंतरही ते सायकल घेऊन लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथील फुटबॉल मैदानात यायचे. शास्त्री स्टेडियममध्ये कोणतीही फुटबॉल स्पर्धा असली, की ते आवर्जून हजर राहून खेळाडूंना मार्गदर्शन करीत होते. त्यांच्या मागे एक मुलगा व एक मुलगी तसेच नातवंडं आहेत.
फुटबॉलचे भीष्माचार्य अत्ताउर रहेमान कुरेशी काळाच्या पडद्याआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 2:02 AM