लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: स्थानिक शौकतअली चौकातील कुरेशीपुरा येथे असलेल्या गोवंश विक्री वजा कत्तलखान्यावर अकोट शहर पोलिसांनी ५ जून रोजी धाड टाकली. यामध्ये दीडशे किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले, तर या ठिकाणी कत्तलीकरिता आणलेले सहा गोऱ्ह्यांची सुटका करण्यात आली. घटनास्थळावरून पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. अकोट पोलिसांना गोवंशाची कत्तल करून मांसविक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून शहर पोलिसांनी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कुरेशीपुरा येथे धाड टाकली. त्यावेळी मो. शोहेब शे. हयात (२३), इरशाद अहेमद शे. नुरा (३०), शे. अकील शे. इशाख (५५), मो. जाकीर अ. मजीर सर्व रा. कुरेशीपुरा अकोट हे दुकान लावून गोवंशाचे मांस विक्री करताना आढळून आले. मो. युसूफ मो. लतीफ (३५), शे. जाहीद शे. इस्माईल (१९), शे. फिरोज शे. हुसेन (२२) सर्व रा. कुरेशीपुरा अकोट, जुनेद अहेमद शे. ख्वाजा (१९) रा. आंबोडी वेस हे सहाय्य करताना आढळून आले. आरोपींकडून दीडशे किलो गोवंश मांस, कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य, वजन काटा, सहा गोवंश गोऱ्हे व नगदी ११,३०० रुपये असा एकूण ८२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. ही धाडसी कारवाई शहर पोलीस निरीक्षक सी.टी. इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. घटनास्थळावरून आरोपींना ताब्यात घेऊन साहित्य जप्त करून हे.काँ. उमेश सोळंके यांच्या तक्रारीवरून उपरोक्त आठ आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२९, ३४ तसेच प्राणी संरक्षण अधिनियम ५ (ब) (क) व ९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सी.टी. इंगळे, पीएसआय प्यारसिंह मानलवी, शरद माळी, उमेश सोळंके, वीरेंद्र लाड, रणजित खेडकर, विलास मिसाळ, अनिल भातखंडे, चिंचोळकर,अमरदीप गुरू, वाहन चालक महाजन आदींनी केली. घटनास्थळावरून ताब्यात घेतलेले गोवंश गोऱ्हे स्थानिक गोरक्षणला सुपूर्द करण्यात आले.
कत्तलखान्यावर धाड
By admin | Published: June 06, 2017 12:57 AM