विजय शिंदे
अकोट: तालुक्यासह सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात परराज्यातील गुरे मोठ्या प्रमाणावर चराईकरिता दाखल होत आहेत. तसेच बंदी असतानाही तालुक्यातील चारा इतर राज्यात पाठविण्यात येत असल्याने तालुक्यात चाराटंचाईचे संकट उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
परराज्यातील गुरांपासून येथील पाळीव गुरे तसेच वन्यप्राण्यांना रोगराईची बाधा होण्याची शक्यता पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. शिवाय आजघडीला असलेल्या गुरांची तपासणी करुन त्यांना मूळ प्रदेशात जाण्याकरिता प्रवृत्त करावे, अन्यथा कठोर कारवाई करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात येत असल्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र राज्यात इतर राज्यातील गुरे मोठ्या प्रमाणावर दाखल झाली आहेत. त्यामुळे तत्सम दुग्धव्यावसायिकांच्या पाळीव गुरांना रोगराई होण्याची शक्यता वाढली आहे.
राज्यात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान आदी राज्यांतून मोठ्या प्रमाणावर काठेवाडी व तत्सम दुग्धव्यावसायिकांची पाळीव गुरे चराईकरिता येत आहेत. विशेष म्हणजे, मध्य प्रदेश व गुजरातमधून प्रचलित प्रवेशमार्गाने येणाऱ्या गुरांचे प्रमाण जास्त आहे. त्यांचे उपद्रवमूल्य मोठ्या प्रमाणावर पाळीव गुरे व अभयारण्याच्या क्षेत्रात असणाऱ्या वन्यप्राण्यांमध्ये तोंडखुरी-पायखुरी व पशुमारीसारख्या रोगराईची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजघडीला राज्यात परप्रांतांमधून मोठ्या प्रमाणात गुरे येत असल्याचे राज्य महामार्गासह इतर मार्गावर दिसून येत आहेत. शेतातील हंगामाची उंलगवाडी झाल्याने चराईकरिता ही गुरे दाखल होत आहेत. दुसरीकडे, सध्या विदर्भात दृष्काळी परिस्थिती आहे, गुरांना मुबलक चारा नसल्याने शेतकरी गुरांची विक्री करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.