लोकमत न्यूज नेटवर्कपातूर (अकोला): तालुक्यातील चारमोळी शिवारात शनिवारी सकाळपासून मुक्त संचार करणार्या बिबटाच्या पिल्लाला वनविभागाच्या पथकाने रविवारी यशस्वीरित्या जेरबंद करुन परत जंगलात सोडले. जंगलातील पाणवठय़ांनी सध्या तळ गाठला आहे. त्यामुळे, पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गावात येत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून गावाजवळ एक बिबट आल्याचे ग्रामस्थांना दिसले होते. २0 जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता बिबटचे एक पिल्लू गावात शिरले. गावातील कुत्रे त्याच्या मागे लागल्याने ते चारमोळी शिवारातील एका पळसाच्या झाडावर चढले. गावाच्या जवळच हा भाग असल्याने ग्रामस्थांना याविषयी माहिती मिळाली. माजी सरपंच रामा ठाकरे यांनी वन विभागाला याविषयी माहिती दिली. बिबट सापडल्याची माहिती मिळताच वन विभागाचे बंडकर व त्यांचे सहायक तसेच गावातील रामा ठाकरे, महादेव जांभकर, श्यामराव ठाकरे, वामन खुळे, मोहन लोखंडे, बजरंग गाढवे आदींनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच बिबटला दोरीच्या साहायाने पकडून चारमोळीच्या जंगलात सोडून दिले. दुर्गम भागात असलेल्या चारमोळी गावात बिबटचा वावराने दहशत पसरली आहे. यापूर्वीही बिबटने गावातील एक गाय आणि गोर्हा फस्त केलेला आहे.
कुत्र्यांच्या भीतीने बिबट चढले झाडावर!बिबट शनिवारी सकाळी चारमोळी गावात दाखल झाले होते. यावेळी गावातील कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. कुत्र्यांच्या भीतीने बिबट गावा शेजारील शेतशिवारात पळसाच्या झाडावर चढले. याविषयी माहिती मिळताच ग्रामस्थांनी झाडाभोवती मोठी गर्दी केली होती.