अतुल जयस्वाल /अकोला
पर्यावरणाचा समतोल टिकून राहावा, यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील झपाट्याने कमी होत असलेली वृक्षसंपदा कायम राहावी व वृक्षांच्या संख्येत वाढ करावी, या उद्देशाने वन विभागाकडून या वर्षीच्या पावसाळय़ात विविध परिक्षेत्रांमध्ये १ लाख ६२ हजार ९00 झाडे लावण्याचे नियोजन आहे. आगामी पावसाळय़ात १८८ हेक्टर क्षेत्रावर नव्याने रोपांची लागवड करण्यात येणार आहे. बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे तापमानवाढ, दुष्काळ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पृथ्वीवरील जंगलांचे प्रमाण कायम राखणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाकडून दरवर्षी पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येते. अकोला वन विभागाने गतवर्षीच्या पावसाळय़ात २0७ हेक्टर क्षेत्रावर २ लाख ६४ हजार ८२४ रोपांची लागवड केली होती. यावर्षीच्या पावसाळय़ात वन विभागाकडून अकोला, पातूर, आलेगाव, बाश्रीटाकळी या परिक्षेत्रांमध्ये विविध योजनांतर्गत १ लाख ६२ हजार ९00 रोपांची लागवड करण्यात येणार आहे. निकृष्ट वनांचे पुनर्वनीकरण, संयुक्त वनव्यवस्थापन, ओ.टी.एस.पी., भरीव वनीकरण तसेच कॅम्पा या योजनांतर्गत येळवण, देवळी, खानापूर, पाचरण, चिंचखेडा, पातूर जिराईत, चिखलवाल, सावरखेड या वनक्षेत्रांमध्ये १८८ हेक्टर क्षेत्रावर १ लाख ६२ हजार ९00 रोपांची लागवड करण्यात येणार आहे.