लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : भिवंडी न्यायालयात बोगस कागदपत्रांद्वारे जामीन मिळवून देण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या मुसक्या भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी १७ नोव्हेंबरला आवळून अटक केली. त्यांना न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. या पाच आरोपींमध्ये वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तीन तर अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील दोन आरोपींचा समावेश असून, यापैकी पातूर तालुक्यातील दोन आरोपींना भिवंडी पोलिसांनी चौकशीसाठी २१ नोव्हेंबर रोजी पातूर येथे आणून त्यांची दोन दिवसपर्यंत चौकशी करण्यात आली.बोगस कागदपत्रांद्वारे गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी भिवंडी न्यायालयात एक टोळी येणार असल्याची माहिती भिवंडीतील शांतीनगर पोलीस स्टेशनचे विशेष तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीपान सोनावणे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी अंकलेकर, समीर तडवी, पोलीस नाईक तुषार वडे, सुशिला इथापे, पोलीस शिपाई किरण मोहिते, श्रीकांत पाटील, नरेंद्र पाटील यांच्या पथकाने न्यायालयाच्या आवारात पाळत ठेवली. त्याचवेळेस त्यांना काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्याचे वाटल्याने त्यांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आवारातील पोलीस चौकीत नेऊन कसून चौकशी केली असता, त्यांच्याकडे असंख्य संशयास्पद शिधापत्रिका, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्रे, तहसीलदारांकडील सही, शिक्का असलेल्या कोर्या शिधावाटप पत्रिका, सातबाराचे उतारे व जमिनीच्या आधारे मिळविलेला ऐपत दाखल आदी बोगस कागदपत्रे आढळून आली. याप्रकरणी आरोपी अब्दुल्ला नासीर रशीद कादर शेख (५५) रा.पातूर , सय्यद रशीद सय्यद रज्जाक (४५) रा. पातूर , तसेच दिनकर देवराम भिसे, चिंतामण नवृत्ती सरकटे व श्रीराम फकिरा सावळे तिघेही रा. अमाना ता.मालेगाव, जि.वाशिम यांना १७ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी अटक केली. त्यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. या घटनेबाबत शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये पाचही आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२0,४६८, ४७१, २0१ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी पातूर येथील रहिवासी असलेल्या अब्दुल्ला नासीर रशीद कादर शेख व सय्यद रशीद सय्यद रज्जाक या दोन आरोपींना शांतीनगर पोलिसांनी २१ नोव्हेंबरला पातुरात आणून दोन दिवसांमध्ये तहसील कार्यालयात नेऊन तहसीलदारांमार्फत बोगस कागदपत्रांची तपासणी केली. त्यात सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात भिवंडीतील दोन वकील मदत करीत असल्याची बाब उघडकीस आल्यामुळे त्यांच्या विरोधातसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, या टोळीतील एक महिला आरोपी फरार झाली आहे. या प्रकरणात पातुरातील दोन आरोपींचा समावेश असल्यामुळे पातूर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
बोगस कागदपत्रांद्वारे जामीन; पातुरात आरोपींची चौकशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:04 AM
भिवंडी न्यायालयात बोगस कागदपत्रांद्वारे जामीन मिळवून देण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या मुसक्या भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी १७ नोव्हेंबरला आवळून अटक केली. त्यांना न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. पातूर तालुक्यातील दोन आरोपींना भिवंडी पोलिसांनी चौकशीसाठी २१ नोव्हेंबर रोजी पातूर येथे आणून त्यांची दोन दिवसपर्यंत चौकशी करण्यात आली.
ठळक मुद्देभिवंडी पोलिसांची कारवाई दोन आरोपी पातूरचे!