राजकारणामध्ये फार काळ काेणी काेणाचा मित्र अथवा शत्रू राहत नाही. या अलिखित नियमाच्या मार्गावरूनच राजकारणी त्यांची दिशा ठरवितात. तर दुसरीकडे स्वत:ला निष्ठावान म्हणवून घेणारे व एकमेकांना पाण्यात पाहणारे कार्यकर्ते कायम सतरंज्या उचलण्यापुरते मर्यादित राहतात, असे दिसून येते. ऑक्टाेबर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत अकाेला पश्चिम मतदारसंघात पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या काॅंग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याने दुसऱ्या राजकीय पक्षाचे तिकीट घेत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. त्या निवडणुकीत काॅंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा अवघ्या २,३०० मतांच्या फरकाने पराभव झाला. साहजिकच या पराभवाचे खापर पक्षातून बंडखाेरी केलेल्या उमेदवारांच्या मस्तकी फुटणार हे स्वाभाविकच हाेते. त्यामुळे पक्षात ‘घर वापसी’चे दरवाजे बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर या माजी पदाधिकाऱ्याने सेनेच्या स्थानिक लाेकप्रतिनिधीच्या घराचे दरवाजे ठाेठावले. यादरम्यान, सेनेतील काही माजी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत सेनेचे संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर यांच्या माध्यमातून सेनेचे माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खा. अरविंद सावंत यांच्यासाेबत बैठक घडवून आणली.
सक्रिय पदाधिकाऱ्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न
आजराेजी इतर राजकीय पक्षांप्रमाणेच शिवसेनेतही दाेन गट आहेत. जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांचा गट पक्ष संघटनेला प्राधान्य देत असल्याचे बाेलल्या जाते. काॅंग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याला पक्ष प्रवेश देऊन अकाेला पश्चिममधील सेनेच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांचे पंख छाटण्याच्या उद्देशातून दुसऱ्या गटाकडून ही खेळी खेळल्या जात असल्याची पक्षात चर्चा रंगली आहे.
पद आणि तिकिटाची हवी शाश्वती
काॅंग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याला सेनेकडून शहर कार्यकारिणी अथवा जिल्हा कार्यकारिणीतील महत्त्वाचे पद हवे असून, यासाेबतच मनपा निवडणुकीसाठी स्वत:ला किंवा मुलाला तिकीट देण्याची शाश्वती हवी असल्याची माहिती आहे.
? () -