अकोला: कौलखेड येथील रहिवासी तसेच पोलीस खात्यातून सहायक पोलीस निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले श्रीराम कजदन गावंडे यांच्यासह त्यांची पत्नी भाजपाच्या माजी महापौर सुमन गावंडे आणि त्यांच्या तीन मुलांविरुद्ध अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने २१ आॅक्टोबर रोजी रात्री उशिरा बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर माजी महापौर सुमन गावंडे यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली; मात्र न्यायाधीश मोनिका आरलॅन्ड यांच्या न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. गावंडे कुटुंबीयांकडे १ कोटी ५२ लाख २२ हजार ८९४ रुपयांची मालमत्ता बेहिशेबी असल्याचे एसीबीने केलेल्या तपासात समोर आले आहे.सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम कजदन गावंडे यांच्या सेवेच्या कार्यकाळातील परीक्षण कालावधीत (म्हणजेच नोकरी करीत असताना ज्या वेळेत अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केली तो कालावधी) सुमारे १ कोटी ५२ लाख २२ हजार ८९४ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचे अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासात समोर आले आहे. ही टक्केवारी सुमारे ३८५.६५ टक्के अधिक असल्याचे समोर आले आहे. या दरम्यान श्रीराम गावंडे यांच्या कुटुंबातील त्यांच्या पत्नी माजी महापौर सुमन श्रीराम गावंडे, मुलगा प्रवीण श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, विक्रम श्रीराम गावंडे यांचा परीक्षण कालावधीतील खर्च आणि उत्पन्न यामध्ये प्रचंड तफावत असल्याचेही एसीबीच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे एसीबीने गावंडे कुटुंबीयांना ही संपत्ती बेकायदेशीर नसल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी दिली होती; मात्र गावंडे कुटुंबीय हे सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याने त्यांच्याविरुद्ध अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेकायदेशीर अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी श्रीराम गावंडे, सुमन गावंडे, प्रवीण गावंडे, रणजित गावंडे, विक्रम गावंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच सुमन गावंडे यांनी जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गावंडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या प्रकरणातील काही आरोपी किसनराव हुंडीवाले हत्याकांडात कारागृहात आहेत, तर काही आरोपी फरार आहेत.