अकोला : गोर बंजारा समाजाचे नेते तथा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मखराम पवार यांचे रविवारी (८) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड या त्यांच्या मुळ गावात सोमवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मखराम पवार हे १९९० मध्ये मुर्तीजापूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर १९९८ मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य म्हूणन निवडून गेले. २७ ऑक्टोबर १९९८ ते ८ जानेवरी २००१ या कालवधित त्यांनी राज्याचे व्यापार व वाणिज्य, दारुबंदी प्रचार कार्य, खनिकर्म व पशूसंवर्धन खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. त्यांच्या पश्चात, दोन मुले, एक मुलगी असा बराचा आप्त परिवार आहे.