अकोला : भारिप-बमसं, वंचित बहुजन आघाडीतून काही दिवसांपूर्वीच बाहेर पडलेले वंचित बहुजन आघाडीतून काही दिवसांपूर्वीच बाहेर पडलेले माजी आमदार हरिदास भदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. येत्या ८ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतच्या बैठकीत त्याबाबत चर्चा होणार असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. तर त्यांच्यासोबतच बाहेर पडलेले माजी आमदार बळीराम सिरस्कार वेगळी वाट चोखाळण्याची शक्यता आहे.भारिप-बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेक वर्ष काम केले. पक्षात विश्वासार्हता संपल्याने या दोन्ही पक्षात असलेल्या पदांचा सामूहिक राजीनामा देत असल्याचे पत्र माजी आमदारद्वय हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह ४५ पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दिले. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान काही प्रकरणांवरून पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद झाले. तसेच काहींना पक्षविरोधी कारवाया केल्याने कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. या सर्व घडामोडीनंतर दोन्ही माजी आमदारांसह वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे महासचिव नवनाथ पडळकर, विधानसभा निवडणुकीतील उमेदवार इम्रान पुंजानी, देखरेख समिती प्रमुख अर्जुन सलगर व इतर मिळून ४५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर बाहेर पडलेले सर्व पदाधिकारी कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करतात, याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यावर माजी आमदार भदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बैठक ठरली आहे. त्यांच्यासोबत १०० ते १२५ पदाधिकारी, कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती आहे. बैठकीला मोजकेच पदाधिकारी उपस्थित राहतील. चर्चेनंतर पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी आमदार सिरस्कार काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.