जिल्ह्यात शिक्षकांची पतसंस्थेचा तब्बल दोन दशक कारभार सांभाळणाऱ्या दिलीप अंधारे यांच्यावर २०११ मध्ये तत्कालीन संचालक अरुण धांडे यांनी तब्बल ५९ लाख ९० हजार १४५ रुपये अपहाराचा आरोप केल्यानंतर पाेलिसांनी अंधारे यांच्यासह तत्कालीन व्यवस्थापक गावंडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला हाेता. शेतकरी खरेदी-विक्री सोसायटीची हर्राषीतील जागा खरेदी व विक्री, सभासदांना भेटवस्तू (ब्लँकेट) वाटप व खरेदी, गजानन खोबरखेडे, गजानन पटोकार, कमलसिंग राठोड, पांडुरंग टेकाडे, अनिता मोरे, गीता घावट यांना नियमबाह्य कर्ज मंजूर करणे, राहुल शरद गावंडे व सोनूबाई डाखोरे यांची गैरकायदेशीर नियुक्ती करीत अध्यक्ष व व्यवस्थापकांनी ५९ लाख ९० हजार १४५ रुपयांचा अपहाराच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. न्यायालयात संपूर्ण बाबींची उकल झाली असता, शेतकरी खरेदी-विक्री संस्थेच्या जागा खरेदी-विक्री व्यवहारात संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तसेच इतर सर्व व्यवहारही नियमाने झाल्याचे न्यायालयासमाेर आले. त्यामुळे तत्कालीन अध्यक्ष दिलीप अंधारे व व्यवस्थापक गावंडे यांनी कोणताही अपहार केल्याचे निष्पन्न न झाल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
तब्बल दहा वर्षे चाललेला हा लढा अखेर संपला आहे. न्यायव्यवस्थेवर आम्हाला विश्वास होता. अखेर न्याय मिळाला. या काळात खूप वेदना सहन कराव्या लागल्या. ही वेळ कुणावरीही येऊ नये. अखेर सत्याचा विजय झाला.
दिलीप अंधारे, माजी अध्यक्ष, शिक्षक पतसंस्था