आकोट: आकोट वन्य जीव विभागांतर्गत मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पाणवठय़ांवर २१ मे रोजी रात्री करण्यात आलेल्या वन्य जीव प्रगणनेत २९२३ वन्य प्राणी आढळून आले. गत दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी ५00 वन्य प्राण्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वन्य जीव परिक्षेत्रातील पाणवठय़ांवर प्रगणनेकरिता ९५ मचाणांची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रगणनेकरिता ७८ निसर्गप्रेमींनी वन्य प्राण्यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. प्रगणनेदरम्यान निसर्गप्रेमींना वनपरिक्षेत्रात वाघ ६, बिबटे १४, तडस १, चांदी अस्वल ३, मुंगूस ७, रान मांजर ९, रात्रकुत्रे ४६, अस्वल ७७, रानकोंबडी ६२, चौसिंगा ३, हरीण ९६, लाल तोंडाचे माकड ३२४, काळ्या तोंडाचे माकड ७0१, सांबार ३0१, गवा २७४, मोर १५२, जंगली डुक्कर ४५५, मसन्या उद २१, चितळ ७३, खवल्या मांजर ८, नीलगाय १0६, ससा १0, सायळ १६ असे एकूण २९२३ वन्य प्राणी आढळून आले आहेत. आकोट वन्य जीव विभागाने मे २0१५ मध्ये केलेल्या प्रगणनेत २४२३ वन्य प्राणी आढळून आले होते. त्या तुलनेत ५00 वन्य प्राण्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वन्य जीव विभागातील अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आल्याने वन्य प्राण्यांना मोकळीक मिळाली आहे. यावर्षी प्रगणना कार्यक्रम उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. नियंत्रणाची जबाबदारी सहायक वन संरक्षक एस.ए. पार्डीकर, व्ही.डी. डेहनकर, एस.जी. साळुंखे, आर.एम. लाडोळे यांनी सांभाळली. निसर्गप्रेमींसोबत पाणवठा प्रगणनेकामी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांची उपस्थिती होती.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आढळले २,९२३ वन्य प्राणी
By admin | Published: May 24, 2016 1:39 AM