अकोला: जिल्ह्यातील २०२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि १४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची मतमोजणी गुरुवारी करण्यात आली असून, निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले, त्यामध्ये ४ हजार ८५ उमेदवार विजयी झाले. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या या निवडणूक निकालात प्रामुख्याने मोठ्या ग्रामपंचातींमध्ये प्रस्थापितांना हादरे देत नवख्या उमेदवारांनी बाजी मारली.आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये पाच वर्षांची मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका घेण्यात आल्या. त्यामध्ये १५ ग्रामपंचायतींच्या अविरोध निवडणुकीवर शिक्कामोर्तब झाले असून, तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २०२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि १४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ आॅगस्ट रोजी मतदान घेण्यात आले. या मतदानात २०२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीतील ४ हजार ३८ उमेदवार तसेच १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४८, अशा एकूण ४ हजार ८६ उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सीलबंद झाले होते. जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुका मुख्यालयी ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी गुरुवार, ६ आॅगस्ट रोजी करण्यात आली. दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणुकांचे सर्व निकाल जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये जिल्ह्यात ४ हजार ८५ उमेदवार विजयी झाले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने मोठ्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात ग्रामपंचायतींमधील सत्ताधारी गटाच्या प्रस्थापितांना नाकारत नवीन उमेदवारांना ग्रामस्थ मतदारांनी संधी दिली. प्रस्थापितांच्या पॅनलचा पराभव करून, नवीन उमेदवार विजयी झाले. अनेक गावांमध्ये प्रस्थापितांना हादरे देत, नवख्या उमेदवारांनी बाजी मारली असून, काही ठिकाणी वर्चस्व कायम ठेवण्यात प्रस्थापितांना यश असल्याचे चित्र निवडणूक निकालात स्पष्ट झाले.