अकोला : गुलजारपुरा येथील मनोज धुमने हत्याकांड व जय वाडेकर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यातील सहाही आरोपींना पोलीस कोठडी संपल्याने मंगळवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. बी. हरणे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने यामधील दोन आरोपींची न्यायालयीन कोठडी तर इतर चार आरोपींना १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. गुलजारपुर्यातील रोकडिया हनुमान मंदिरासमोर कर्णकर्कश आवाजात विशिष्ट प्रकारची गाणी वाजविल्यावरून झालेल्या वादानंतर मनोज धुमने आणि त्याचा मित्र जय वाडेकर यांच्यावर विभिन्न धर्मातील युवकांनी तलवार, पाइपसह काठय़ांनी हल्ला चढविला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोजचा मृत्यू झाला, तर जय वाडेकर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सहा आरोपींना अटक केली. यामध्ये मोहम्मद अजीम नासीर अहमद, इमरान हुसेन इरफान हुसेन, शेख महेबूब शेख इलियास आणि त्याचाच भाऊ शेख अकील शेख इलियास, इम्रान खान बिस्मिल्ला खान व शेख जावेद शेख बिस्मिल्ला यांचा समावेश आहे. या सहाही आरोपींची मंगळवार ११ ऑगस्ट रोजी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना डाबकी रोड पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. बी. हरणे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने मोहम्मद अजीम नासीर अहमद व इमरान हुसेन इरफान हुसेन या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तर शेख महेबूब शेख इलियास, शेख अकील शेख इलियास, इम्रान खान बिस्मिल्ला खान व शेख जावेद शेख बिस्मिल्ला या चार आरोपींना १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्याकांड प्रकरणातील आणखी काही आरोपी फरार असून, डाबकी रोड पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.त्यासाठी काही ठिकाणी पथकेही पाठविण्यात आली होती.
चार आरोपींना पोलीस कोठडी, इतर दोघांची कारागृहात रवानगी
By admin | Published: August 12, 2015 1:33 AM