अकोला : कोरोनानंतर प्रथमच देशांतर्गत सय्यद मुश्तक अली टी-२० क्रिकेट स्पर्धा झाली. इंदूर येथे आता दि. २० फेब्रुवारीपासून विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेला सुरुवात होत असून, स्पर्धेकरिता विदर्भ क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. विदर्भ किक्रेट संघात अकोला क्रिकेट क्लबचे दर्शन नळकांडे, अथर्व तायडे, आदित्य ठाकरे व मोहित राऊत या चार खेळाडूंची निवड झाली आहे. चौघांनीही नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले आहे.
दर्शन नळकांडे हा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाजी करणार असून, त्याने यापूर्वी १९ वर्षांखालील भारतीय संघाचे इंग्लंड येथे तसेच रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून आयपीएल स्पर्धेचे प्रतिनिधित्व करीत आहे. तसेच अथर्व तायडे हा सलामीला खेळणारा डावखुरा शैलीदार फलंदाज असून, त्यानेही १९ व २३ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आदित्य ठाकरे हा मध्यमगती गोलंदाज असून, त्यानेसुद्धा यापूर्वी १६, १९, २३ वर्षांखालील विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व तसेच १९ व २३ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मोहित राऊत हा डावखुरा फिरकी गोलंदाज तसेच शैलीदार फलंदाज असा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. यापूर्वी मोहितने २३ वर्षांखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व व अमरावती विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
विदर्भ संघ हा एलिट ग्रुप ‘बी’मध्ये असून, त्याचा सामना ग्रुपमधील तमिळनाडू, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश आणि आंध्रप्रदेश या संघासोबत होईल. या खेळाडूंच्या निवडीबद्दल त्यांचे अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, सहसचिव कैलाश शहा, ऑडिटर दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, सदस्य ॲड. मुन्ना खान, गोपाळराव भिरड, शरद अग्रवाल, माजी कर्णधार विवेक विजवे, क्रीडा परिषद सदस्य जावेद अली, परिमल कांबळे, रणजी खेळाडू रवी ठाकूर, सुमेद डोंगरे, अमित माणिकराव, पवन हलवणे, शारिक खान, देवकुमार मुधोळकर, एस. टी. देशपांडे, अभिजित मोरेकर, किशोर धाबेकर यांनी त्यांचे अभिनंदन करून स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
-----------------------
गेल्या ६-७ वर्षांत क्लबच्या खेळाडूंनी अकोला क्रिकेट क्लब, जिल्हा तथा विदर्भाचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे. ही बाब अकोला क्रिकेट क्लब व जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंकरिता प्रेरणादायी आहे.
- भरत डिक्कर, अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक.