महान : अकोला शहराची तहान भाविणाºया बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथी काटेपूर्णा धरणाचे चार वक्रद्वार बुधवारी एक फुटाने उघडण्यात आले. पूर्णा नदीपात्रात ९६.४४ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून महान धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महान धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचा जलसाठा ९१.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाटबंधारे विभागाच्या जलाशय परिचालन आराखड्यानुसार १ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट दरम्यान धरणात ८५ टक्क्यापर्यंत जलसाठा ठेवून त्यावरील शिल्लक पाण्याचा नदीपात्रात विसर्जित करावा लागतो. १० आॅगस्टपासून धरण पाणलोट क्षेत्रात व मालेगाव परिसरात दमदार पाऊस झाल्याने पूर नियंत्रण लक्षात घेता १२ आॅगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता धरणाचे १, ५, ६ व १० क्रमांकाचे गेट एक फुटाने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. या चारही गेटमधून ९६.४४ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. १२ आॅगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता धरणाचा जलसाठा ११३९.३८ फूट, ३४७.२८ मीटर, ७८.६८३ द.ल.घ.मी. व ९१.१२ टक्के एवढा होता.१ जून ते १२ आॅगस्टपर्यंत एकूण ३८९ मिमी. पावसाची नोंदसुद्धा महान पाटबंधारे विभागाने घेतली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये येणारी काटा कोंडाळा नदीचा प्रवाह वाढला की महान धरणाचे आणखी गेट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी १२ आॅगस्ट २०१९ रोजी धरणात केवळ ५.५४ टक्के जलसाठा होता. त्या तुलनेत यंदा ८६ टक्के जलसाठा आहे. यापूर्वी १ आॅगस्ट रोजी धरणाचे पहिल्यांदाच चार गेट १० सेंमीने उघडले होते. त्या गेटमधून ६८ तासात एकूण ७.४२ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते.