तेल्हारा : अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सिमेवर असलेल्या वान नदीवरील धरणाचे चार वक्रद्वार शनिवारी सकाळी १०.१५ वाजता उघडण्यात आले. वान प्रकल्पातुन नदीपात्रात ८५.९१ घ.मी./से.एवढा विसर्ग करण्यात येत आहे.
सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेले वान धरण तेल्हारा व लगतच्या बुलडाणा जिल्ह्याातील गावांसाठी वरदान ठरले आहे. गत चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे वान धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. वाढती जलपातळी लक्षात घेता शुक्रवारी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. पाण्याची आवक सुरुच असल्याने शनिवारी सकाळी आणखी दोन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. वान प्रकल्पातुन नदीपात्रात होत असलेला विसर्ग ५४.३५ घ.मी./से. वरून वाढवून ८५.९१ घ.मी./से.एवढा करण्यात येत आहे.प्रकल्पाचे २ वक्रद्वारे प्रत्येकी ५० सेमी उंचीने व २ वक्रद्वारे प्रत्येकी २५ सेमी उंचीने उघडुन नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.