अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शनिवार १८ जुलैपासून पुढील तीन दिवस जिल्ह्यात संपूर्ण ‘लॉकडाऊन’ पाळण्यात येणार असून, ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी करण्याचा आदेश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिला.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.अकोला शहरासह जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या बघता, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी १८ जुलै पासून २१ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण ‘लॉकडाऊन’ पाळण्याचा आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनाला दिला. संपूर्ण ‘लॉकडाऊन’ ची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. संपूर्ण लॉकडाऊनदरम्यान जीवनाश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
अकोला जिल्ह्यात १८ जुलैपासून पुढील तीन दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 6:43 PM