अकोला : गत चार महिन्यांपासून ठाण मांडून बसलेल्या कोरोनाचा कोरानाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शनिवार, १ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील आणखी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ’आरटीपीसीआर’ चाचण्यांमध्ये २४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १०९ झाली असून, एकूण रुग्णसंख्या २६६१ वर गेली आहे. दरम्यान, १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सद्यस्थितीत ४३८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.पश्चिम विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी ओळख झालेल्या अकोल्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शनिवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे २७० अहवाल प्राप्त झाले. यापैकी २४ पॉझिटिव्ह असून, उर्वरित २४६ निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये आठ महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील आठ जण, अकोट, खांबोरा बार्शिटाकली व जठारपेठ येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित बाभूळगाव जहांगीर, बाळापूर, दहीहंडा, शिवाजी नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी दोन महिला व चार पुरुषांसह सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये राम नगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन जण तर धाबा ता. बाशीर्टाकळी व कला सोसायटी, अकोला येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.एकाच दिवशी चौघांचा मृत्यूशनिवारी अकोला शहरातील जेतवन नगर भागातील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना २६ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. दुपारनंतर तीन जणांचे मृत्यू झाले़. यापैकी एक हिवरखेड येथील ६९ वर्षीय पुरुषाचा सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना दि. २३ जुलै रोजी दाखल झाले होते. तसेच एका खाजगी रुग्णालयात दोन जणांचा मृत्यू झाला. त्यात एक ७७ वर्षीय महिला असून त्या नानक नगर निमवाडी येथील रहिवासी आहेत. तर अन्य एक ७२ वर्षीय पुरुष असून ते अंबिका लेआऊट ता. अकोट येथील रहिवासी आहेत.१८ जणांना डिस्चार्जदरम्यान, शनिवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून १० जणांना तर आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण अशा एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.४३८ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६६१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २११४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४३८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.