अकाेला : दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा बाेली प्रकल्प अखेर २०२१ मध्ये पूर्णत्वास गेला. राज्यातील विद्यापीठांनी हा प्रकल्प नाकारला मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मराठी विभागामार्फत हा प्रकल्प पूर्ण केला. लाेककवी डाॅ. विठ्ठल वाघ यांनी विदर्भातील गावाेगावी प्रवास करून वऱ्हाडी म्हणी, वाक्प्रचारांचे संकलन केले. त्यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या वऱ्हाडी बोली शब्दकोश, म्हणकोश व वाक्प्रचार कोशाचे प्रकाशन राज्य मराठी विकास संस्था मुंबई येथे करण्यात आल्याने वऱ्हाडी बाेलीचा गाेडवा वाढल्याच्या प्रतिक्रिया भाषा अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने डाॅ. रामदास डांगे यांच्या अध्यक्षतेखाली सन २०११ मध्ये बाेली प्रकल्प सुरू केला. त्यापूर्वीपासून वऱ्हाडी बाेलीभाषचे काम अकाेल्यात श्री शिवाजी महाविद्यालयाचे तत्कालिन प्राचार्य डाॅ. विठ्ठल वाघ व विद्यार्थी डाॅ. रावसाहेब काळे यांनी सुरू केले हाेते. त्यांच्या कार्याची दखल घेत संत गाडगेबाबा विद्यापीठाने या प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्याकडे साेपविली. यामध्ये डाॅ. विठ्ठल वाघ यांनी मुख्य संशाेधक तर डाॅ. रावसाहेब काळे यांनी सहायक संशाेधकाची भूमिका पार पाडली. प्रकल्प प्रमुख म्हणून डाॅ. मनाेज तायडे यांनी काम पाहिले. हे काम अकाेला, अमरावती, लाेणी येथून सुरू झाले. डाॅ. वाघ यांनी वऱ्हाडातील गावाेगावी भ्रमंती करून वऱ्हाडी म्हणी, वाक्प्रचार, शब्दांचे संकलन केले. लहान मुलांच्या शाळेतून, म्हाताऱ्या माणसांच्या जवळून शब्द, म्हणी, वाक्प्रचार गोळा केले. आपल्या कविता गावातील अबालवृद्धांना ऐकवत व त्यांच्या जवळून हे सर्व साहित्य जमा करत होते. असे अविरत काम चार वर्ष चालू राहले आणि २०१४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. एवढे मोठे कोश तयार करणारी वऱ्हाडी बोली ही महाराष्ट्रातील पहिली बोलीभाषा आहे.
वऱ्हाडात काढली काव्ययात्रा
डॉ. विठ्ठल वाघ हे वऱ्हाडातील असल्यामुळे आयुष्यभराच्या, ४०-५० वर्षांच्या त्यांच्या अवलोकनातून हा प्रकल्प उभा राहिला. ‘पारंपरिक वऱ्हाडी म्हणीचा चिकित्सक अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय असल्यामुळे संपूर्ण वऱ्हाडात काव्ययात्रा काढली. या काव्ययात्रेत पायी गावागावात फिरून लोकांच्या समोर ‘तिफण हाकलली’ आणि वऱ्हाडातील हजारो लोकांनी म्हणी, शब्द, वाक्प्रचारांच्या ओट्या भरूभरू या ‘तिफणकऱ्याला’ लोकवाङ्मयाने श्रीमंत केले. तीच श्रीमंती आज या कोशांना लाभल्याचे बाेलीभाषा अभ्यासक सांगतात.
मुख्यमंत्र्यांनी केले काैतुक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त राज्य मराठी विकास संस्थेच्या वाङ्मय पुरस्कार सोहळ्यात वऱ्हाडी बोलीच्या कोशाचा उल्लेख करून काैतुक केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व सर्व कार्यकारिणी सदस्य, श्री शिवाजी महाविद्यालय अकोला विकास समितीचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. रामेश्वर भिसे यांनी डॉ. विठ्ठल वाघ यांचे अभिनंदन केले.