अकोला : फोर-जीसाठी रिलायन्स कंपनीच्यावतीने सुरू असलेले खोदकाम तात्काळ थांबविण्याचे निर्देश महापौर उज्ज्वला देशमुख यांनी मंगळवारी प्रशासनाला दिलेत. सात दिवसांच्या आत फोर-जी कराराची माहिती सादर करण्यासोबत सर्वसाधारण सभा स्थगित करीत असल्याचे महापौरांनी सभागृहात स्पष्ट केले. याव्यतिरिक्त उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या निलंबनासाठी आयोजित केलेली विशेष सर्वसाधारण सभासुद्धा स्थगित करीत असल्याचे त्यानी नमूद केले.मनपाच्या मुख्य सभागृहात स्थगित सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला सुरुवात होताच, माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे निधन झाल्याने त्यांना सभागृहाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फोर-जीच्या मुद्दय़ावर विरोधी पक्षनेता साजीद खान, भारिप-बमसंचे गटनेता गजानन गवई यांनी प्रशासनाला धारेवर धरले. तत्कालीन महापौर ज्यौत्स्ना गवई यांनी फोर-जीचा करार संशयास्पद असल्यामुळे कंपनीचे खोदकाम थांबवण्याचे निर्देश प्रशासनाला ऑगस्ट महिन्यात सभेत दिले होते. आजपर्यंत प्रशासनाने यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा मुद्दा गवई यांनी उपस्थित केला.
फोर-जीचे खोदकाम बंद करा!
By admin | Published: December 03, 2014 1:14 AM